शहाजीराजे गोडसे मित्र मंडळाच्या आंदोलनाचा प्रशासनाने घेतला धसका; मागण्या मान्य करण्याबाबत दिले पत्र

 

स्थैर्य, वडूज, दि.२९: पंतप्रधान आवास योजनेच्या कामातील रिक्त असलेल्या अभियंता पदामुळे रखडलेली घरकुलची कामे तसेच लाभार्थ्यांची बिले, शेतकऱ्यांना या योजनेचा न मिळणारा लाभ या करण्यासाठी विरोधीपक्ष नेते शहाजीराजे गोडसे यांनी ३० सप्टेंबर रोजी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या आंदोलनाच्या धसक्याने वडूज नगरपंचायत प्रशासनाने श्री गोडसे यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे आंदोलनापूर्वीच शहाजीराजे गोडसे मित्रमंडळला यश मिळाले आहे.

यावेळी डॉ. महेश गुरव, संदीप गोडसे, प्रदीप खुडे, संजय काळे, सोमनाथ जाधव, डॉ. प्रशांत गोडसे, दीपक बोडरे, निलेश गोडसे यांची प्रमुख उपस्थिती होती.

याबाबत अधिक माहिती अशी वडूज नगरपंचायतीमध्ये पंतप्रधान आवास योजनेची कामे संबंधित विभागाचे अभियंता पद रिक्त असल्याने कामे पुर्णपणे रखडली आहे. त्यामुळे तात्काळ संबंधित विभागाच्या अभियंताचे पद भरून लभार्थ्यांच्या कामांची बिले अदा करावीत.पंतप्रधान आवास योजनेच्या पहिल्या जीआर नुसार कृषी क्षेत्रात या योजनेचा लाभ शेतकरी यांना घेता येत नव्हता. नवीन जीआर नुसार या योजनेचा सर्वसामान्य शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. 

परंतु पंतप्रधान आवास योजनेचा अभियंता पद रिक्त असल्यामुळे या योजनेपासून सर्वसामान्य व शेतकरी वर्ग वंचित राहणार आहे. यासाठी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व सत्ताधारी पक्ष यावर कोणतेही ठोस निर्णय घेत नाही. यातून नगरपंचायत प्रशासनाचा ढिसाळ कारभार होत असल्याबाबत 30 सप्टेंबर रोजी जन आक्रोश मोर्चा काढून नगरपंचायतीला टाळेठोक आंदोलनाचा इशारा नगरपंचायतीचे विरोधी पक्षनेते शहाजीराजे गोडसे यांनी निवेदनाद्वारे दिला होता. या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर नगरपंचायत प्रशासन खडबडून जागे झाले आहे. याबाबत त्यांनी विरोधी पक्षनेते शहाजीराजे गोडसे यांना लेखी पत्र देत या मागण्या मान्य केल्या आहेत. 

या पत्रातील अधिक माहिती अशी या योजनेसाठी काम करणारे अभियंता यांचे करार नूतनीकरण करूनदि १ पासून त्यांच्याकडे पदभार देण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्र बँकेतील काही अधिकारी बाधित आल्याने निधी वितरणास विलंब झाला आहे. याबाबत लेखा विभागातील अधिकाऱ्यांशी बोलणे झाले असून १५ दिवसात उर्वरित या योजनेतील निधीचे वितरण केले जाणार आहे. 

तसेच ३ सप्टेंबर रोजीच्या शासन परिपत्रकानुसार ठराविक अटी शर्थी घालून ग्रीन झोन मध्ये परवानगी देणेबाबत जिल्हाधिकारी यांनी आदेश दिल्याने कोणीही वंचीत राहणार नसल्याचे या पत्रात म्हटले आहे. 

पतीराज व उपऱ्यांचा हस्तक्षेप चालू देणार नाही.....

नगरपंचायतमध्ये काही पतीराजकडून हस्तक्षेप केला जात आहे. तर उपरे नगरपंचायतीच्या कारभारात लुडबुड करीत आहेत. यामुळे सर्व सामान्य नागरिकांच्या योजनेत अडथळा निर्माण होत आहे. आणि यामुळे अनेक लाभार्थी वंचीत राहत आहेत. अशा पतीराज व उपऱ्यांचा वडूज नगरपंचायत मध्ये हस्तक्षेप चालू देणार नाही असा इशारा विरोधीपक्ष नेते शहाजीराजे गोडसे यांनी दिला आहे.


ज्या कामासाठी नगरपंचायतीची स्थापना केली आहे त्यासाठी नगरपंचयातीने असनारी कामे तातडीने करावीत व घरकुल सह कृषी अवजारे, कृषी योजना सह अन्य योजना गरजूंना त्वरित मिळाव्यात. शहरातील शेतकरी या योजनेपासून अजूनही वंचीत आहेत. त्यामुळे त्वरित हे विषय मार्गी लावावेत अस मत सामाजिक कार्यकर्ते विजय दादा शिंदे यांनी व्यक्त केले आहे.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya