मल्हारपेठ-पंढरपूर रस्त्यावरील पूल गेला वाहून.. वाहतूक ठप्पस्थैर्य, कराड, दि. १२ : अखेर  व्यक्त केलेली भीती खरी ठरली असून खचलेल्या पर्यायी माती भरावांच्या रस्त्याची संबंधित ठेकेदाराने केलेली चुकीची मलमपट्टी ही चांद नदीच्या वाढलेल्या प्रवाहाला थोपवू शकली नाही. यामुळे हा रस्ता पाण्याच्या दाबाने वाहून गेला आहे. मल्हारपेठ-पंढरपूर या राज्य महामार्गावरील वाहतूक बंद झाली असून ग्रामस्थांनी यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.


गेल्या दोन दिवसांपूर्वी मल्हारपेठ -पंढरपूर या राज्य महामार्गावर मुख्य गावाच्या दोन्ही बाजूला असणार्‍या पुलाच्या कामाविषयी व निकृष्ट खचलेल्या पर्यायी मातीच्या भरावाचा रस्ता वाहून जाण्याची शक्यता व्यक्त केली होती. वाढलेल्या चांद नदीच्या प्रवाहामुळे चांदणी चौकमधील भराव रास्ता खचला होता. यावर एक डंपरही अडकून पडला होता. परंतु हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करून जुन्या पुलावरून पोलिसांनी वाहतूक सुरू ठेवली होती. परंतु बातमीच्या माध्यमातून संबंधित ठेकेदाराला भराव रस्त्याच्या पाण्याला प्रवाहित करण्यासाठी टाकलेल्या फक्त दोन पाइपची संख्या वाढवून सहा करण्याची गरज असल्याची माहिती दिली होती. परंतु भवानी मंदिर परिसरातील मुख्य जुना पूल नवीन निर्मिती करण्यासाठी तीन ते चार महिन्यापूर्वी तोडण्यात आला होता तर पर्यायी वाहतूक चांद नदीवर फक्त दोन पाइप टाकून मातीचा रस्ता तयार करण्यात आला होता. हा रस्ता तीन दिवसांपूर्वी नदीच्या वाढलेल्या पाण्याने खचू लागला होता. संबंधित ठेकेदाराने पाण्याचा प्रवाह सुरळीत होण्यासाठी पाइपची संख्या न वाढवता भराव टाकून रस्त्याची रुंदी वाढवण्यावर भर दिला. सकाळी पाण्याचा दाब वाढल्यामुळे चुकीच्या पद्धतीने टाकलेला भराव वाहून गेला.

 

कलेढोण, कुकुडवाड, म्हसवड, दिघंची, अकलूज व पंढरपूरकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. सध्या हा रस्ता पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने सुरळीत करणे अवघड आहे. वेळीच संबंधित ठेकेदाराने योग्य ती उपाययोजना केली असती तर हा राज्य महामार्ग बंद होण्याची वेळ आली नसती.


खचलेला पूल दुरुस्त करण्यासाठी आम्ही भरावाची रुंदी वाढवली. परंतु पाण्याचा दाब वाढल्याने हा भराव वाहून गेला आहे. आता आम्ही मोठ्या पाइप मागवल्या असून या पाइपची संख्या वाढवून रस्ता वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करत आहोत.  - नवनाथ मिसाळ, कामाशी संबंधित व्यक्ती
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya