प्राध्यापक होण्यासाठी आवश्यक असणारी नेट परीक्षा उत्साहात सुरू

 


कोरोना पार्श्वभूमीवर घेतली जात आहे संपूर्ण काळजी - यशेंद्र क्षीरसागर


स्थैर्य, सातारा, दि. २९ : वरिष्ठ महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक होण्यासाठी तसेच ज्युनियर रिसर्च फेलोशिप मिळण्यासाठी आवश्यक असणारी राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात नेट परीक्षा उत्साहात सुरू झाली. ही परीक्षा संपूर्णतः ऑनलाइन घेतली जात आहे. 24 सप्टेंबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान ही परीक्षा होत आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी तर्फे यूजीसी मार्फत ही परीक्षा घेतली जात आहे.मराठी, इंग्रजी, पत्रकारिता, संगीत, योगा अशा  81 विषयातून ही परीक्षा घेतली जात आहे.देशातील एकूण 225 शहरातून या परीक्षेसाठीची केंद्रे आहेत.साताऱ्यात सुद्धा शेकडो विद्यार्थी उत्साहाने ही परीक्षा देत आहेत.


जून 2020 मध्ये होणारी ही परीक्षा कोरोना संकटामुळे सप्टेंबरमध्ये सुरू झाली आहे. सहाय्यक प्राध्यापक होण्यासाठी ही परीक्षा महत्त्वाची आहेच. परंतु ;त्यासोबत ज्युनियर रिसर्च फेलोशिप ही संशोधन शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी देखील नेट परीक्षा अत्यंत आवश्यक आहे. केवळ सहाय्यक प्राध्यापक होण्यासाठी या परीक्षेला वयाची अट नाही. परंतु; ज्युनियर रिसर्च फेलोशिप मिळवायची असेल तर वयाची अट निर्धारित करण्यात आली आहे. एम.फिल., पीएच.डी अशाप्रकारचे संशोधन करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ही एक सुवर्णसंधी असते.त्यामुळे या परीक्षेची उत्सुकतेने वाट पाहिली जाते. या परीक्षेतून मेरीट मधून विद्यार्थी उत्तीर्ण होतात. किमान ठराविक गुण मिळवावे लागतात. त्यानंतर त्या गुणांच्या पातळी वरील गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमधून प्रत्येक विषयातील सहा टक्के विद्यार्थ्यांना उत्तीर्ण म्हणून घोषित केले जाते. या परीक्षेमध्ये एकूण दोन पेपर आहेत. पहिला पेपर सामान्य ज्ञानाचा असून सर्व विषयांच्या सर्व विद्यार्थ्यांना तो अनिवार्य आहे. पहिल्या पेपरमध्ये 50 प्रश्न असतात. त्यासाठी 100 गुण आहेत. दुसरा पेपर हा शंभर प्रश्नांचा आणि 200 गुणांचा असून तो विद्यार्थ्यांच्या पदव्युत्तर पदवीच्या विषयाचा असतो. अशा पद्धतीने ही परीक्षा दीडशे प्रश्न आणि तीनशे गुणांची असते. परीक्षेसाठीची वेळ तीन तास आहे. दोन्ही पेपर वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी आहेत. दोन पेपरमध्ये अंतर ठेवलेले नाही. दोन्ही पेपर एकाच वेळी संगणकावर उपलब्ध असतात. ही परीक्षा दिवसातून दोन शिफ्टमध्ये सकाळी नऊ ते बारा आणि दुपारी तीन ते सहा विषयानुसार घेतली जात आहे. नेहमी साधारण आठ दिवसात संपणारी ही परीक्षा असते. सध्या कोरोनाच्या काळामुळे 24 सप्टेंबर ते 5 नोव्हेंबर एवढा दीर्घ कालावधी या परीक्षेसाठी लागणार आहे. परीक्षेची माहिती आणि संपूर्ण वेळापत्रक, तसेच प्रवेशपत्रे "नॅशनल टेस्टिंग एजन्सी" च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. टप्प्याटप्प्याने दर दोन-तीन दिवसांच्या परीक्षांची प्रवेश पत्रे उपलब्ध केली जात आहेत. एप्लीकेशन नंबर आणि जन्मतारीख त्यासाठी गरजेची आहे. परीक्षा स्थळावर नेमक्या वेळेत पोहोचणे आवश्यक आहे, कारण त्यानंतर लॉगीन होत नाही. कोरोना काळातील सर्व बाबी सांभाळून परीक्षा घेतल्या जात आहेत. सॅनिटायझर आणि मास्क अनिवार्य आहेत. विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक ते अंतर राखून बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. अध्यापन क्षेत्रात कार्य करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा महत्त्वाची आहे. दुसरे वैशिष्ट्य असे कि सेट परीक्षेत ज्युनियर रिसर्च फेलोशिपची सोय नाही. फक्त; नेट परीक्षेतूनच ज्युनियर रिसर्च फेलोशिप मिळू शकते. कसून आणि गांभीर्याने तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा म्हणजे एक सुवर्णसंधी असते. त्यामुळे ही परीक्षा उत्साहाने दिली जात आहे.Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya