रुग्णाने आजाराला कंटाळून व नैराश्यातून कृष्णा नदी पात्रात उडी मारून केली आत्महत्या

 


स्थैर्य, पांचगणी, दि. ०६ : वाई येथील कोविडं रुग्णालयात उपचार सुरु असणार्‍या रुग्णाने आजाराला कंटाळून व नैराश्यातून रुग्णालयातील डॉक्टर व आरोग्य सेविकेला धक्काबुक्की व मारहाण करत पळून जाऊन कृष्णा नदी पात्रात उडी मारून आत्महत्या केली. 


संचित कोविडं रुग्णालयानजीक आज दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. पाचवड (ता वाई) येथील पासष्ट वयाच्या जेष्ठ नागरिक चाचणीमध्ये चार दिवसांपूर्वी करोना बाधीत असल्याचे आढळून आले होते. त्यांना वाई येथील संचित कोविडं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाली होती. शनिवारी रात्री त्यांनी मुलाला फोन करून माझी प्रकृती उत्तम आहे मला आता घरी घेऊन जावा असे म्हणाले होते. मात्र त्यांना करोना आजारामुळे नैराश्य आले होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्येचा विचार बोलून दाखवला होता. पहाटे साडेचारच्या सुमारास त्यांनी रुग्णालयातून कृत्रिम प्राणवायूची यंत्रणा (ऑक्सिजन) काढून फेकून देऊन आरोग्य सेविका व डॉक्टरांना धक्काबुक्की करून पळून गेले. डॉक्टर आरोग्य सेविका कर्मचार्‍यांना यांनी पीपीइ किट घातल्यामुळे त्यांच्या मागे पळता येत नव्हते. पहाटे डॉ विद्याधर घोटवडेकर याना माहिती दिल्यानंतर ताबडतोब डॉक्टरांनी रात्रगस्तीवरील पोलिसांच्या मदतीने पकडून रुग्णालयात आणले. त्यांना समजूत घालून त्यांना विश्राती घेण्याचा सल्ला दिला. या प्रकाराची नातेवाईकाना कल्पना देण्यात आली. पुढील उपचारात त्यांना खाटेला बँडेज पट्टीच्या साहाय्याने बंधन ठेवले होते. आपल्याला करोना झाला आहे याचे त्यांना वाईट वाटत होते. त्यांनी घरी सोडण्याची मागणी केली होती मात्र उपचार व इंजेक्शनचा डोस पूर्ण होई पर्यंत त्यांना घरी सोडणे शक्य नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. दोनतीन दिवसांनी त्यांना घरी सोडण्यात येणार होते. दरम्यान आज दुपारी त्यांनी पुन्हा कृत्रिम वायू (ऑक्सिजन) यंत्रणा काढून टाकली. त्यावेळी रुग्णालयातील डॉक्टरांनी व सेविकांना त्यांना प्रतिबंध केला असता त्यांनी स्वतःच्या ताकदीने बँडेज पट्ट्या तोडून खाटेवरून उठून डॉक्टर व सेविकेला धक्काबुक्की व मारहाण करून संरक्षक दरवाजा तोडून रुग्णालयातून पळ काढला व लगतच्या कृष्णा नदी पात्रात उडी मारली. डॉ घोटवडेकर व सहकारी कर्मचार्यांनी नदी पात्रातून बाहेर काढून रुग्णालयातील कोविडं अतिदक्षता विभागात आणले. परंतु त्यांच्या नाकातोंडात पाणी गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. यावेळी गणपती घाटावर सिरीयलचे चित्रकरण सुरु असल्याने गर्दी होती. मात्र त्यांना कोणीही उडी मारण्यापासून रोखले नाही आणि नंतर पाण्यातून काढताना कोणी मदत केली नाही. केवळ बघ्यांची गर्दी होती. या घटनेची नोंद वाई पोलीस ठाण्यात झाली आहे.


Previous Post Next Post