करोना संसर्गाने हळद बाजार कोलमडला; शेतकरी, व्यापारी हवालदिल

 


स्थैर्य, सांगली, दि.११: करोना संसर्गामुळे सांगली च्या हळद बाजाराला मोठा फटका बसला. लॉकडाउनमुळे बंद राहिलेले हॉटेल्स, उद्योगधंदे आणि निर्यातबंदीमुळे हळद बाजारातील उलाढाल ७० टक्क्यांनी घटली. याशिवाय दरातही कमालीची घट झाली. गेल्या पाच महिन्यात मागणीअभावी अवघी दोन लाख १० हजार क्विंटल हळदीची विक्री झाल्याने शेतकरी आणि व्यापारी हवालदिल झाले आहेत.

देशात दरवर्षी सुमारे एक कोटी क्विंटल हळदीचे उत्पादन होते. या हळदीच्या खरेदी-विक्रीचे सर्वात मोठे मार्केट सांगलीत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीचे सौदे होतात. चांगल्या दराची परंपरा असल्याने महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, तेलंगणातील शेतकरी हळदीच्या विक्रीसाठी सांगलीत येतात. लिलाव पद्धतीने विक्री केल्यानंतर शेतक-यांना हळदीच्या (हळकुंडे) गुणवत्तेनुसार प्रतिक्विंटल तीन ते नऊ हजार रुपये दर मिळतो. यंदा मात्र करोना संसर्गामुळे हळद उत्पादक शेतकरी आणि व्यापा-यांचे नियोजन कोलमडले. गेल्या पाच महिन्यांपासून जगभरात करोनाचा संसर्ग सुरू असल्याने याचा फटका हळद बाजाराला बसला.

लॉकडाउनमध्ये हळदीचे सौदे बंद झाले. प्रत्यक्ष लिलाव पद्धतीने होणा-या सौद्यांसाठी गर्दी होत असल्याने सांगलीच्या जिल्हाधिका-यांनी ऑनलाइन लिलाव पद्धत सुरू केली. मात्र, वाहतुकीची गैरसोय असल्याने बाहेरचे शेतकरी येऊ शकले नाहीत. हॉटेल्स आणि उद्योगधंदे बंद राहिल्याने मागणीतही कमालीची घट झाली. परिणामी व्यापा-यांनीही हळद खरेदीसाठी हात आखडते घेतले. गेल्यावर्षी एप्रिल ते जुलै या चार महिन्यात सव्वासहा लाख क्विंटल हळदीची विक्री झाली होती. यंदा याच चार महिन्यात केवळ दोन लाख १० हजार क्विंटल हळदीची विक्री झाली. विशेष म्हणजे यातील दोन लाख २ हजार क्विंटल हळदीची विक्री मे महिन्यात झाली. उर्वरित तीन महिन्यांमध्ये केवळ आठ हजार क्विंटल हळदीची विक्री झाली. बाजार पूर्णतःच थंडावल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांचेही आर्थिक नियोजन कोलमडले आहे. डिसेंबर-जानेवारीमध्ये नव्या हंगामास सुरुवात होणार आहे. नवीन हळद बाजारात येताच दर उतरण्याचा धोका आहे. यामुळे यंदाच्या हंगामाप्रमाणे येणारा हंगामही शेतक-यांसाठी कठीण ठरू शकतो.

दरातही झाली घसरण

गेल्यावर्षी हळदीला प्रतिक्विंटल सरासरी आठ ते नऊ हजार रुपये दर मिळाला होता. दर्जेदार हळदीला १२ हजार ७०० रुपयांचा दर मिळाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केल जात होते. यंदा मार्च महिन्यात १३ हजारांवर गेलेला दर संचारबंदीच्या काळात चार हजार रुपयांवर आला. जुलै महिन्यात सरासरी दर केवळ ३४२० रुपये मिळाल्याने शेतकऱ्यांनी हळद विक्रीकडे पाठ फिरवली आहे. 

करोना संसर्गामुळे हळदीच्या सौद्यांवरही परिणाम झाले. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी काही काळ ऑनलाइन सौदे सुरू केले. मात्र, याला अपेक्षित प्रतिसाद नसल्याने पुन्हा सौदे थांबले. बाजारातील हळदीची मागणी वाढल्यानंतरच परिस्थिती पूर्वपदावर येईल. 

-नीलकंठ करे – प्रशासक, बाजार समिती, सांगली

यंदा हळदीला चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा होती. पण करोना संसर्गामुळे सगळेच नियोजन विस्कटले. नव्या हंगामाची हळद येण्यापूर्वी जुनी हळद विकायची झाल्यास आम्हाला उत्पादन खर्चदेखील मिळणार नाही.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya