श्रद्धांजली: प्रणवदा पंतप्रधान व्हावेत यासाठी आम्ही ‘लॉबिंग’ केलं होतं, कारण..; माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या भावना, त्यांच्याच शब्दांत...

 


स्थैर्य, दि.१: पाच वर्षांपूर्वीची ही घटना. दिल्लीत २०१५ मध्ये माझ्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त अमृतमहोत्सवी सत्कार सोहळा होता. त्याला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आवर्जून हजर होते. त्या कार्यक्रमात त्यांनी माझे जे कौतुक केले, त्यासाठी जे शब्द योजले, ते आजही माझ्या कानात गुंजत आहेत. भाषणाच्या शेवटी प्रणव मुखर्जी म्हणाले होते, “सलाम मुंबई, सलाम शरद पवार’! राष्ट्रपतिपदावरचा माणूस इतक्या दिलदारपणे कौतुक करतो, हे सोपे नाही.

हे प्रणवदाच करू शकतात. कारण त्यांच्यामध्ये ते खुलेपण होते. त्यामुळेच ते पक्षाच्या, संकुचित राजकारणाच्या पलीकडे गेले होते. प्रणवदा हा अतिशय मोकळाढाकळा असा छान माणूस होता.

भारतीय राजकारणात मागच्या तीनेक दशकांत वलयांकित म्हणून जी मोजकी नावे चर्चिली जातात, त्यात प्रणव मुखर्जी अव्वलस्थानी होते. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये प्रणव मुखर्जी यांचा अधिकार मोठा होता. या सरकारचे ते संकटमोचक होते. यूपीए सरकारमध्ये चौदाएक तरी मंत्रिगट होते. त्या मंत्रिगटाचे मुखर्जी प्रमुख होते. खरं तर, यूपीए सरकारचा सुकाणू पंतप्रधान म्हणून मनमोहनसिंग यांच्या हाती होता, तरी सरकाररूपी नौका वल्हवणारे हात मात्र मुखर्जी यांचेच होते! “यूपीए दोन’मध्ये प्रणव मुखर्जी यांचे पंतप्रधानपदाचे स्वप्न पूर्ण व्हायला हरकत नव्हती. त्यासाठी मीही त्यांचा शुभचिंतक होतो. त्यांच्यासाठी लाॅबिंग करण्यात मी पुढे होतो. दक्षिणेकडील राज्यांचे पाठबळ मुखर्जी यांच्यामागे उभे करण्याचा मी प्रयत्नसुद्धा केला. माझे मित्र आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ताकदही मी मुखर्जी यांच्यामागे उभी केली होती.

प्रणव मुखर्जी यांचा अनुभव दांडगा होता. भारतासारख्या बहुविविधता असलेल्या खंडप्राय देशाचे पंतप्रधान होण्यासाठी ते योग्य उमेदवार हाेते. गृह, संरक्षण, अर्थ अशी अत्यंत कळीची व संवेदनशील खाती त्यांनी अनेकदा सांभाळली होती. विविध खात्यांच्या कारभारात त्यांना गती होती, बारीकसारीक माहिती होती. अनेक विषयांवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांना पीएमपदाची संधी लाभली असती तर देशाला निश्चित लाभ झाला असता. भारत देश एक आर्थिक महासत्ता व्हावी, असे त्यांचे स्वप्न होते!

यूपीए सरकारमध्ये मी गृह, संरक्षण आदी खात्यांची जबाबदारी स्वीकारेन, असा त्यांचा होरा होता. मला तशी विचारणा करण्यात आली. अनेकांनी ही संधी सोडली नसती. मी मात्र कृषी विभाग मागून घेतला. त्या वेळी मुखर्जी यांना माझ्या निर्णयाचा धक्का बसला. तितकेच त्यांना माझे कौतुकही वाटले.

प्रणव मुखर्जी पुढे राष्ट्रपती झाले. त्यानंतर ते बारामतीला आले. बारामतीत कृषी क्षेत्रातील नवतंत्रज्ञानाचे जे प्रयोग चालू होते, त्यांची प्रत्यक्ष माहिती घेतली. ते प्रयोग त्यांनी अगदी जवळून पाहिले. बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रालासुद्धा भेट दिली. अगदी कृषी विज्ञान केंद्रातले झाडन‌्झाड त्यांनी पाहिले. अर्धा दिवस तरी त्यांनी कृषी क्षेत्रातील प्रयोग समजून घेण्यासाठी दिला असावा. राष्ट्रपती होऊनही त्यांच्यात असणारी मूलभूत विषयासंदर्भातली उत्सुकता बिल्कुल कमी झाली नसल्याचे प्रत्यंतर मला बारामती दौऱ्यावेळी पाहण्यास मिळाले. मुखर्जी यांनी बारामतीतल्या भेटीत आमच्या कृषी प्रयोगाविषयी जे उद्गार काढले होते, ते आम्ही फलकरूपाने बारामतीत अजरामर केले आहेत. मी यूपीए सरकारमध्ये कृषिमंत्री या नात्याने केलेल्या कामांची त्यांना कल्पना होती. भारतात हरितक्रांती झाली खरी; पण देश अन्नधान्यासंदर्भात तुमच्या कृषिमंत्रीपदाच्या कार्यकाळात आत्मनिर्भर झाला, असे ते मला नेहमी कौतुकाने म्हणायचे. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र अनेक क्षेत्रांत देशात आघाडीवर राहिला आहे. कदाचित ही तीच नाळ होती, ज्यामुळे आम्ही जवळ आलो.  

Previous Post Next Post

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.