उद्धव ठाकरे म्हणाले होते, ‘पोलीस भांडी घासायच्या लायकीचे आहेत!’ देवेंद्र फडणवीसांचा थेट निशाणा

 

स्थैर्य, मुंबई, दि.९: राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या दुस-या दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या, विदर्भातील पूरपरिस्थिती, शेतक-यांचे प्रश्न आणि कंगना राणौत प्रकरणावरून सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांवरून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारी सरकारला चांगलेच धारेवर धरले. यावेळी गाजत असलेल्या मुंबई पोलिसांच्या अवमानाच्या मुद्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरच निशाणा साधला.

फडणवीस म्हणाले की, मी राज्याचा गृहमंत्री म्हणून काम पाहिले आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत मला पूर्ण कल्पना आहे. मात्र कधी कधी राजकीय हितसंबधांचा प्रभाव पोलिसांच्या कामगिरीवर होतो. आता पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याबाबत म्हणाल तर या सभागृहामध्येही अनेकदा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काही काळापूर्वी कल्याणच्या सभेत राज्यातील पोलीस हे भांडी घासायच्या लायकीचे आहेत, असे विधान केले होते. भूमिका बदलल्या की आपण कसे बदलतो याचे हे एक उदाहरण आहे. चर्चा करायची असेल, विषयांतर, विषय बदलायचे असतील तर ते कसे काय बदलता येतात हे आपण बघितले आहे.

राज्यातील कोविड सेंटरमध्ये महिलांवर अत्याचाराची प्रकरणे घडली आहेत. आता कोविड केंद्रामध्येही महिला सुरक्षित नसतील तर त्या सुरक्षित कुठे असतील. राज्यात दिशा कायदा लागू करण्याबाबत चर्चा सुरू होती. त्याला आम्हीही समर्थन दिले असते. मात्र या दिशा कायद्याची दिशा कॅबिनेटच्या बैठकीत कशी बदलली हे ठावूक आहे, असा टोलाही फडणवीस यांनी यावेळी लगावला.

वृत्तपत्र, माध्यमांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत बोलाणारे सध्या गप्प आहेत. एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला काही दिवसांपूर्वी तुरुंगात टाकले होते. कुणाचा एकेरी उल्लेख करू नये हे मान्य. पण माध्यमांनी सरकारच्या विरोधात बोलूच नये, ही या सरकारची भूमिका आहे. एखादे माध्यम सरकारच्या विरोधात गेले की नोटीस द्या, हक्कभंग लावा, असा कारभार चाललाय. मग हीच भूमिका ‘सामना’च्याबाबतीतही लावा. त्यात पंतप्रधान, राज्यपाल यांच्याबाबत काय बोललं जातं याचा आढावा घ्या. मुख्यमंत्र्यांचा मान राहिला पाहिजे. आम्हीही त्यांचा सन्मान करतो. मात्र राज्यपाल, पंतप्रधानांना, इतर नेत्यांना मान नाही काय? असा टोलाही फडणवीस यांनी यावेळी लगावला.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya