डबेवाल्यांचे राज ठाकरेंना साकडे

 

 
स्थैर्य, मुंबई, दि.२४: गेल्या सहा महिन्यांपासून उपासमारीला सामोरे जावं लागलेल्या मुंबईच्या डबेवाल्यांनी गुरुवारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मुंबईतील लोकल सेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याची आणि डबेवाल्यांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळवून देण्याची मागणी राज ठाकरे यांच्याकडे केली. तसेच डबेवाल्यांच्या व्यथाही राज यांच्यासमोर मांडल्या.

राज ठाकरेंच्या निवासस्थानी कृष्णकुंजवर ही भेट झाली. मुंबई डबेवाला असोशिएशनचे सुभाष तळेकर यांच्या नेतृत्वाखाली डबेवाल्यांच्या शिष्टमंडळाने राज ठाकरेंची भेट घेतली. यावेळी राज ठाकरेंना डबेवाल्यांनी मागण्यांचं निवेदन दिले आहे.

मनसेने लोकल सेवा सुरू करण्यासाठी आंदोलन केलं. त्यामुळे सरकारने हा इशारा समजून लोकल सेवा पूर्ववत करावी. आमचं पोट या लोकल सेवेवर अवलंबून आहे. त्यामुळे आता लोकल सुरू न झाल्यास मनसेने वात पेटवली आहे. त्याचा भडका होऊ शकतो. आम्हालाही या आंदोलनात सहभागी व्हावं लागेल, असा इशारा मुंबईतील डबेवाल्यांनी राज ठाकरेंच्या भेटीपूर्वी दिला होता. त्यानंतर त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली.

मनसेच्या लोकल प्रवास सविनय कायदेभंगाला मुंबई डबेवाला असोशिएशनकडून बिनशर्त पाठिंबा देण्यात आला होता. रेल्वे प्रशासनाने लोकलसेवा सुरु करण्याबाबत लवकर निर्णय घ्यावा. अन्यथा मनसेप्रमाणे आम्हाला लोकलने प्रवास करुन सविनय कायदेभंग करावा लागेल, असा इशारा मुंबई डबेवाला असोशिएशनने दिला होता.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya