राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र:सरकारच्या डोळ्यावर कुठल्या गुंगीची झापड आली आहे? नाईलाजाने आदेश झुगारुन मंदिर प्रवेश करावा लागेल, राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा

 

स्थैर्य, मुंबई, दि.३: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण राज्यभरात धार्मिक स्थळे ही बंद आहेत. अनलॉक सुरू आहे अनेक व्यवसाय सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली आहे मात्र अद्यापही मंदिर खुली करण्यास परवानगी नाही. यावरुन आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले आहे. तसेच सरकारच्या डोळ्यावर कुठल्या गुंगीची झापड आली आहे? असा सवाल करत नाईलाजाने आदेश झुगारुन मंदिर प्रवेश करावा लागेल असा इशाराही राज ठाकरेंनी दिला आहे.

राज ठाकरेंनी पत्रामध्ये लिहिले की...
  • मॉल्स उघडले जात आहेत, सार्वजनिक कार्यक्रमातील लोकांची उपस्थिती 100 करण्याची परवानगी दिली जात आहे, मग सरकारला मंदिरं उघडण्याच्या बाबतीत इतका आकस का आहे?
  • सरकारने मंदिरं सगळ्यात शेवट उघडून उगाच नको ते पुरोगामीत्व दाखवू नये त्यापेक्षा एक नियमावली आखावी आणि हिंदुजनांच्या मंदिर प्रवेशाचा मार्ग मोकळा करावा
  • लवकरात लवकर सकारात्मक पाऊल उचललं नाही तर आम्हाला नाईलाजाने सरकारच्या आदेशांना झुगारून मंदिर प्रवेश करावा लागेल
  • सध्या महाविकास आघाडी सरकारचं काही बाबतीतील धोरणशैथिल्य हे फारच बुचकळ्यात टाकणारं आहे. ह्या सरकारच्या डोळ्यावर कुठल्या गुंगीची झापड आली आहे की ज्यामुळे गेले अनेक दिवस श्रद्धाळू हिंदू भाविकांचा सुरु असलेला कंठशोष सरकारच्या कानावर पडत नाहीये?
  • मंदिरं सुरु करणं म्हणजे निव्वळ काही भक्तांच्या पुरता हा विषय मर्यादित नाही, इथे त्यात देवाची सेवा करणारे पुजारी असोत, गुरव असोत की त्या मंदिरावर अवलंबून असणारी एक छोटीशी अर्थव्यवस्था असो ह्यांचा सरकार विचार करणार आहे का नाही?
  • एका मंदिरावर त्या गावाची, त्या शहराची अर्थव्यवस्था अवलंबून असते ती अर्थव्यवस्थाच जर कोलमडणार असेल तर त्यांनी साकडं घालायचं कोणाकडे?
  • गेले ५ महिने सगळं अर्थकारण ठप्प आहे, लोकांच्या नोकऱ्या गेलेत, व्यवसाय पार बुडालेत, त्यामुळे आतातरी सरकारने निर्बंध शिथिल करून, सार्वजनिक वाहुतकीचं नीट नियोजन करून ह्या ह्या अर्थकारणाला धुगधुगी द्यावी अशी जनतेची अपेक्षा आहे.
  • ह्यासाठी लोकांनी सरकारकडे विनंत्या, आर्जवं केली, टाहो फोडला, पण सरकार स्वतःच्या धुंदीत तल्लीन झालंय त्यामुळे ‘देव तारी त्याला कोण मारी’ ह्या अंतिम श्रद्धेतून त्यांना त्यांच्या ईश्वराला साकडं घालायचं आहे, देवा ह्या अस्मानी, सुलतानी संकटातून सोडव असं आर्जव करायचं आहे आणि म्हणूनच सरकारने देव आणि त्याचे भक्त ह्यांची ताटातूट करण्याचा फंदात पडू नये.
Previous Post Next Post