5 जीसाठी 1.3 ते 2.3 लाख कोटींची गुंतवणूक गरजेची; 2023 मध्ये फाइव्ह जी सेवा सुरू होण्याचा अंदाज

 


स्थैर्य, दि.२१: देशात फाइव्ह जी सेवा सुरू होण्यास भलेही तीन ते चार वर्षे लागणार असतील, मात्र सर्वसामान्य ग्राहकांना यासाठी थोडी जास्त वाट पाहावी लागणार आहे. संपूर्ण देशात फाइव्ह जी दूरसंचार सेवा सुरू करण्यासाठी दूरसंचार कंपन्यांना १.३ ते २.३ लाख कोटी रुपये गुंतवणूक करावी लागणार आहे, जे सध्या कठीण आहे. अशा स्थितीत तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, निवडक सर्कलमध्ये काही विशेष सेवांसाठीच फाइव्ह जी सुविधा मिळेल. इतर लोकांना हळूहळू ही सुविधा पोहोचेल. वित्तीय संस्था मोतीलाल ओसवालच्या एका रिसर्च रिपोर्टनुसार, फाइव्ह जीमध्ये तीन प्रमुख गुंतवणुकी आहेत. प्रथम स्पेक्ट्रम, दुसरी साइट आणि तिसरी फायबर. संपूर्ण देशात फाइव्ह जी नेटवर्क लावण्याची गुंतवणूक लो बँड स्पेक्ट्रमवर १.३ लाख कोटी आणि मिड बँड स्पेक्ट्रमवर २.३ लाख कोटी असेल. वित्त वर्ष २०२३ पासून फाइव्ह जी सुरू होईल,असे गृहीत धरले तरीही येत्या चार-पाच वर्षांत आणखी गुंतवणूक करावी लागेल. दूरसंचार कंपन्यांची वित्तीय स्थिती आणि प्रति ग्राहक सरासरी महसुलाचा कमी दर पाहता गुंतवणूक खूप कठीण वाटते. अशा स्थितीत संपूर्ण देशात फाइव्ह जी सेवा सुरू करण्याऐवजी या कंपन्या काही सर्कलमध्ये स्पेक्ट्रम घेऊन इंटरनेट ऑफ थिंग्ज ऑपरेशनसारख्या सेवांची सुविधा सुरू करतील.

इतिहासात डोकावल्यास भारत तंत्रज्ञान अपडेट करण्यात विकसित देशांपेक्षा १० वर्षे मागे आहे. मात्र, फोरजीत हे अंतर घटून चार वर्षे राहिले होते. कारण, तेव्हा जिओने संपूर्ण ताकदीने इकोसिस्टिम अपडेट केली होती. मात्र, भारताच्या दूरसंचार बाजारात कोणताही नवा खेळाडू उतरण्याची शक्यता नाही.

२६ देशांमध्ये कमर्शियल लाँचिंग झाले

जगातील २६ देशांमध्ये फाइव्ह जीचे व्यावसायिक लाँचिंग झाले आहे. मात्र, आतापर्यंत याचे केवळ १ कोटी ग्राहक आहेत. वित्त वर्ष २०२५ पर्यंत ग्राहक संख्या वाढून २८० कोटी होईल, असा अंदाज आहे. अमेरिका, दक्षिण कोरिया आणि चीन फाइव्ह जीच्या स्पर्धेत सर्वात पुढे आहेत.

> दोन स्पेक्ट्रमवर अवलंबून असेल फाइव्ह जी सेवा ७०० मेगाहर्ट्‌झ : याची किंमत सुमारे ३२८ अब्ज रुपये आहे, जी खूप महाग आहे.

> ३,३००-३,६०० मेगाहर्ट्‌झ : ही अपेक्षेपेक्षा स्वस्त आहे. याची किंमत प्रति मेगाहर्ट्‌झ ४.९ अब्ज रु. आहे. दोन्ही स्पेक्ट्रम टूजी/फोरजी सेवांचा वापर होत आहे.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya