आदित्य ठाकरेंनी केली कांजूरमार्गमधील नव्या जागेची पाहणी, सुधारित योजनेसह कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी येथे उभारली जाणार मेट्रो 3 आणि 6 ची कारशेड

 

स्थैर्य, मुंबई, दि.१४:  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे कारशेड कांजूरमार्ग येथे हलवण्याची घोषणा नुकतीच केली. या कार्यात पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंची महत्त्वाची भूमिका राहिल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते. यानंतर विरोधक राज्य सरकारवर सातत्याने निशाणा साधताना दिसत आहेत. दरम्यान आता आदित्य ठाकरे यांनी कांजूरमार्गमधील नव्या जागेची पाहणी केली आहे. ट्विट करत त्यांनी याविषयी माहिती दिली आहे.

आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, 'कारशेड उभारण्यासाठी एमएमआरडीएकडे सोपवण्यात आलेल्या जागेवर आज सकाळी मुख्यमंत्री कार्यालय, एमएमआरडीए, एमएमआरसीएल अधिकाऱ्यांनी भेट दिली. सुधारित योजनेसह कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी मेट्रो 3 आणि 6 ची कारशेड येथे उभारले जातील. मातीचे परीक्षण येथे यापूर्वीच सुरू झालेले आहे. जागेची पाहणी करण्यासाठी मी त्यांच्यासोबत उपस्थित होतो.' असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

मेट्रो-3 साठीच्या कारशेडसाठी कांजूर येथील सरकारी मालकीची जागा शून्य रुपये दराने जनहितासाठी देण्याचा सरकारचा निर्णय घेण्यात आला आहे. आरेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्यात येणार आहे. आरेतील जंगलाची व्याप्ती आता 600 वरून 800 एकरवर होणार आहे.

कारशेडविषयी मुख्यमंत्री म्हणाले रविवारी म्हणाले होते की, 'मुंबईसाठी मोठा निर्णय सांगून मी लाईव्हची सुरूवात करणार आहे. आरे कारशेडला माझा सुरुवातीपासूनच विरोध होता. मी तेव्हा मुख्यमंत्री नसतानाही याविषयी भूमिका मांडली होती. त्यामुळे आरेतील जंगलासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आरे येथील 600 एकर जमीन जंगल म्हणून घोषित करण्यात आली आहे. यासोबतच या जंगलाची व्याप्ती 800 एकर झालेली आहे. यासोबतच आरेतील कारशेड दुसरीकडे म्हणजेच कांजूरमार्ग येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.'

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya