ठोसेघर येथील धबधबा सुरू करण्यास परवानगी द्या

 


स्थैर्य, सातारा, दि. ०८ : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या सात महिन्यांपासून बंद असणारा ठोसेघर, ता. सातारा येथील धबधबा व पर्यटनस्थळ सुरू करण्यास जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी परवानगी द्यावी अशी मागणी बाबाराजे युवा मंचचे पठार विभाग अध्यक्ष प्रवीण चव्हाण यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. पर्यटकांना आकारण्यात येणार्‍या पर्यटन शुल्काच्या माध्यमातून गावातील विकासकामे केली जातात. हे  पर्यटनस्थळ बंद असल्यामुळे विकासकामांवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. पर्यटक येत नसल्यामुळे छोट्या-मोठ्या व्यवसायांवर परिणाम होऊन अनेकांवर बेरोजगाराची वेळ आली आहे.


काही वर्षापूर्वी ठोसेघर संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून ठोसेघर धबधबा पाहण्यासाठी येणार्‍या पर्यटकांना मूलभूत  सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे अल्पावधीत येथील धबधबा परिसर बारमाही पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जावू लागले. या ठिकाणी पर्यटकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन धबधबा परिसरात खाजगी जागांमध्ये अनेकांनी वडापाव, भजी, मिसळ, आम्लेट, चहा- कॉफी, शीतपेये, मक्याची कणसे, ठोसेघर येथील प्रसिद्ध बासमती तांदूळ विक्री करणारी छोटी  दुकाने सुरू केली. पर्यटकांना अल्पोपहार आणि जेवणासाठी काही हॉटेल्सही या परिसरात उभी राहिली. स्थानिक भूमिपुत्रांना गावातच रोजगार उपलब्ध झाल्यामुळे त्यांच्या चेहर्‍यावर आनंद होता.


मार्च 2020 मध्ये जिल्हा प्रशासनाने लॉकडाउन जारी करत हॉटेल व्यवसाय, मंदिरे, पर्यटनस्थळे पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना केल्या.  तब्बल सात महिने पर्यटनस्थळे बंद असल्यामुळे संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांची आर्थिक गणिते पूर्णपणे बिघडून गेली आहेत.