नाराज उपमुख्यमंत्र्यांना सर्दी-ताप की ‘राजकीय’ आजार? खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेश सोहळ्याच्या पूर्वसंध्येला अजित पवार आजारी

 

स्थैर्य, मुंबई, दि.२३: राजकीय घुसमट होत असल्याने भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशासाठी उत्सुक एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीसोबतच घरोबाही सहजासहजी होणार नाही हे गुरुवारी स्पष्ट झाले. एकीकडे राष्ट्रवादीच्या कार्यालयात खडसे प्रवेशाची जोरदार तयारी सुरू असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार आजारी असल्याची बातमी आली. त्यामुळे ते खडसेंच्या पक्षप्रवेश सोहळ्यासही उपस्थित राहणार नाहीत.

अजित पवार यांना ताप आला असून सर्दीचा त्रास आहे. ते गुरुवारी प्रदेश कार्यालयात होणाऱ्या पूर्वनियोजित जनता दरबाराला येऊ शकणार नाहीत असे बुधवारी रात्री जाहिर करण्यात आले. त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. मात्र, ती निगेटिव्ह आली असून दादा काही दिवस सुटीवर असतील. सध्या ते मुंबईतील घरी विश्रांती घेत आहेत. सर्व प्रशासकीय बैठकांना ते व्हर्च्युअली उपस्थित राहतील असे अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, तर दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार यांची तब्येत ठीक असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे खडसे प्रवेशावर अजित पवार नाराज असल्याचे स्पष्ट झाले. मुळात खडसे यांना पक्षात घेण्यास अजित पवार कधीच अनुकूल नव्हते. खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर जेव्हा पत्रकारांनी छेडले त्या वेळी त्यांनी मौनच बाळगले आहे.

राष्ट्रवादी कार्यालयात सोहळ्याची जोरदार तयारी
राष्ट्रवादीच्या बॅलार्ड पिअर येथील कार्यालयात गुरुवारी खडसेंच्या प्रवेशाची जोरदार तयारी चालू होती. दुपारी २ वाजता प्रदेश कार्यालयाच्या मुख्य सभागृहात एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांचा प्रवेश होईल. त्याला पक्षाध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि मोजकेच पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

व्यासपीठावरच पत्रकार परिषद : प्रदेश कार्यालयाच्या बाहेर एक व्यासपीठ उभारण्यात आले आहे. तिथून पवार आणि खडसे प्रसिद्धिमाध्यमांशी बोलणार आहेत. बॅलार्ड पियर परिसरातील सर्व रस्ते शुक्रवारी सकाळपासून बॅरिकेड लावून अडवण्यात येणार आहेत. गर्दी होऊ नये म्हणून कार्यकर्त्यांना प्रदेश कार्यालयाच्या गल्लीमध्ये प्रवेश असणार नाही. कार्यालयाभोवती पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya