अरुण सरनाईक जन्मदिन : (४ ऑक्टोबर, १९३५)त्यांचे वडील पंडित शंकरराव सरनाईक यांना  "महाराष्ट्रकोकीळ" अशी पदवी मिळाली होती तर काका पंडित निवृतीबुवा सरनाईक हे शास्त्रीय संगीत गाणारे कलाकार होते. या पार्श्वभूमीमुळे असेल कदाचित, ते स्वतः हार्मिनिम व तबला अतिशय छान वाजवायचे,त्यांचे तबल्याचे कौशल्य मा.बाळासाहेब ठाकरे याना खूप आवडायचे.


मूळचे कोल्हापूरचे असणारे अरुण सरनाईक यांनी पदवीचे शिक्षण मुंबई मधील रुईया कॉलेज मध्ये घेतले.त्या नंतर काही काळ त्यांनी इचलकरंजी येथे नोकरी केली.


दिग्दर्शक अनंत माने यांनी अरुण सरनाईक याना घेऊन शाहीर परशुराम हा सिनेमा काढला आणि या सिनेमाने मराठी जनतेला देखणा चेहरा लाभलेले अरुण सरनाईक माहीत झाले. कृष्ण धवल सिनेमांचा जमाना होता तो, त्या मध्ये त्यांनी भूमिका केल्या.


वरदक्षिणा, सवाल माझा ऐका, केला इशारा जाता जाता, देवा तुझी सोन्याची जेजुरी, एक गाव बारा भानगडी, मुंबईचा जावई, घरकुल, मनाचा मुजरा, गणान घुंगरू हरवलं,चंदनाची चोळी अंग अंग जाळी आणि सिंहासन हे त्यांचे गाजलेले चित्रपट.


म.गो.रांगणेकरांच्या नाटकांपासून त्यांनी त्यांच्या अभिनयाला सुरवात केली.


भटाला दिली ओसरी, अपराध मीच केला, गुडबाय डॉक्टर, तरुण तुर्क म्हातारे अर्क, आणि चांदणे शिंपीत जा, ही नाटके त्यांनी केली.


अरुण सरनाईक हे गाणे देखील गायचे, त्यांच्या आवाजातील,एक लाजरा न साजरा मुखडा (चंदनाची चोळी अंग अंग जाळी) पप्पा सांगा कुणाचे (घरकुल) ही गाणी खूपच गाजली होती व आजही ऐकली जातात.


बाबा पाठक यांनी दिग्दर्शित केलेला 'संथ वाहते कृष्णामाई' (१९६७). पुढे आशुतोष गोवारीकरने केलेल्या 'स्वदेस' (२००४) या हिंदी चित्रपटाचे मूळ तिथेच होते आणि मराठीत अरुण सरनाईक यांनी केलेली इंजिनिअरची भूमिका यात शाहरुख खानने केली! 


यानंतरचा दुसरा म्हणजे राजा ठाकूर दिग्दर्शित 'मुंबईचा' जावई' (१९७०) हा एकत्र कुटुंब आणि महानगरातील घराची समस्या यावरील चित्रपट. यावर पुढे बासू चटर्जींनी 'पिया का घर' (१९७२) हा हिंदी चित्रपट केला. 

 

तिसरा महत्वाचा चित्रपट म्हणजे डॉ. जब्बार पटेल यांचा 'सिंहासन' (१९७९). लेखक अरुण साधू यांच्या ‘सिंहासन’ कादंबरीवर आधारित या चित्रपटाची निर्मिती जब्बार पटेल यानी केली. चित्रपटात सत्तेच्या राजकारणाचे अनेक पैलू त्यामध्ये बारकाव्याने टिपले आहेत. यात अरुण सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांची साकारलेली व्यक्तिरेखा ही त्यांच्या अभिनय कारकिर्दीतील सर्वोच्च ठरली! पुरस्कारासह त्यावरील चर्चाही गाजल्या. त्यातल्या एका प्रसंगात मुख्यमंत्री म्हणतात, 

"मला जायचे होते देवाच्या आळंदीला, प्रत्यक्षात आलो चोरांच्या आळंदीला."


अशाच एका परिसंवादात त्यांनी सांगितले  की 'आपल्या भूमिकेस मिळालेली खरी पावती म्हणजे (तत्कालिन मुख्यमंत्री) वसंतदादा पाटील यांना भेटायला गेल्यावर "या सी. एम..!" म्हणून त्यांनी केलेले स्वागत!'


२१ जून ,१९८४ साली या गुणी अभिनेत्याचा कोल्हापूरहून पुण्याला जाताना कासेगाव येथे झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला व मराठी चित्रसृष्टी एक उत्तम अभिनय करणाऱ्या अभिनेत्या मुकली.


अजून एक आठवण सांगावीशी वाटते मुंबईचा जावई ह्या सिनेमामध्ये नाटकाची तालीम करत असलेला प्रसंग आहे व अरुण सरनाईक प्रथम तुज पाहता हे गाणे गात आहेत असे दृश्य होते, हे गाणे सुधीर फडके याना दाखवल्यावर फडके म्हणाले हे गाणे जरी सिनेमामधील असले तरी नाटकाच्या अंगानी जाणारे आहे या गाण्याला रामदास कामतच न्याय देऊ शकतील त्या मुळे हे गाणे त्यांच्या कडून गाऊन घ्या. धन्य ती माणसे ज्यांना दुसऱ्याच्या गायकीचा गौरव करावा वाटतो. या गाण्याच्या चित्रीकरणाच्या वेळी अरुण सरनाईक यांच्या ओठाच्या हालचाली अगदी अचूक झाल्या आहेत 


प्रसाद जोग. सांगली. ९४२२०४११५०Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya