सातार्‍यात दोन पोलिसांवर प्राणघातक हल्ला

 


एकजण गंभीर जखमी, दोघेजण ताब्यात

स्थैर्य, सातारा, दि. 21 : गोडोली नाका-शिवराज पेट्रोल पंपानजिक दोन पोलिसांवर एकाने लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केला. यामध्ये एक पोलीस गंभीर जखमी तर एकाच्या हाताला मोठी दुखापत झाली आहे. 


याबाबत माहिती अशी, सातारा शहर पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले पोलीस कर्मचारी दत्ता वैजनाथ डोलारे व मधुकर हिंडे हे त्यांची ड्युटी संपल्यानंतर मित्रांचे समवेत कणसे ढाबा येणे जेवण करण्याकरीता जात होते. त्यावेळी सातारा शहरातील हॉटेल मानसी समोर गोडोली नाका ते शिवराज तिकाटणे जाणारे रोडवर असणार्‍या भाजीपाल्याचे गाड्याजवळ दत्ता डोलारे यांच्या ओळखीच्या मनोज डांगरे यांस येथे का उभा आहे, असे विचारल्याचे कारणावरून दत्ता डोलारे व मनोज डांगरे यांच्यात वाद झाला. मनोज डांगरे याने त्याचा साथीदार प्रसाद महामुनी व इतरांना बोलावून घेतले. प्रसाद महामुनी येताना हातामध्ये लोखंडी रॉड घेवून आला व त्याने पो. कॉ. दत्ता डोलारे यांच्या डोक्यामध्ये लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर दुखापत केली. तसेच त्याने मधुकर हिंडे यांच्या डाव्या हातावर लोखंडी रॉड मारुन त्यांनाही गंभीर दुखापत केली. 


याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यानंतर पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल व अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखा व गुन्हे प्रकटीकरण शाखा यांच्या पथकाने आरोपींचा शोध घेवून मनोज अरुण डोंगरे रा. गणेशनगर विलासपूर सातारा व प्रसाद उर्फ परश्या विकास महामुनी महामुनी रा. विलासपूर सातारा यांना ताब्यात घेतले. या प्रकरणाची चौकशी सहायक पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल या करत आहेत.