मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक नियंत्रण कामी कार्यरत मुंबई पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्याचे दुर्दैवी अपघाती निधन

 

स्थैर्य, दुधेबावी दि. १३ : मुंबई - पुणे महामार्गावर पनवेल येथे गस्त घालणारे पोलीस कर्मचारी सचिन नागदास सोनवलकर (वय ३५, रा. दुधेबावी, ता. फलटण) यांचा दोन वाहनांची धडक होवून झालेल्या अपघातात वाहनाचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाला आहे. 

सचिन नागदास सोनवलकर यांच्या पश्चात आई वडील पत्नी १ मुलगा व १ मुलगी असा परिवार आहे. अत्यंत गरीब कुटुंबातील असलेले सचिन सोनवलकर हे ८/१० वर्षापूर्वी मुंबई पोलीस दलात भरती झाले होते. शांत व संयमी हुशार असलेल्या सचिन सोनवलकर यांचे शालेय शिक्षण दुधेबावी ता. फलटण येथे, माध्यमिक शिक्षण जयभवानी हायस्कूल, तिरकवाडी येथे, उच्च माध्यमिक शिक्षण मुधोजी हायस्कूल व मुधोजी महाविद्यालय फलटण येथे बी. ए. पर्यंत झाल्यानंतर पोलीस दलात भरती झाले होते. मुंबई पोलीस दलात ते गेली ८/१० वर्षे कार्यरत होते. 

अपघाताबाबत घटनास्थळ व मित्र मंडळी आणि दुधेबावी ग्रामस्थ यांचेकडून समजलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलीस दलात कार्यरत असणारे सचिन सोनवलकर हे मुबंई-पुणे महामार्गावर गस्त घालत असताना सोमवारी रात्री २.४५ वाजण्याच्या सुमारास पनवेल येथील हद्दीत पुणे बाजूला जाणाऱ्या मालवाहू (MH 04 4563) ट्रकला मागून आलेल्या एका ट्रेलरने (NL 01 L 6497)धडक दिल्याने तेथे गस्त घालणारे पोलीस कर्मचारी सचिन सोनवलकर यांना अपघातातील वाहनाचा जोरदार धक्का लागला.

वाहनांचा वेग जास्त असल्याने सचिन सोनवलकर यांना जोरात मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
पनवेल पोलीस ठाण्यात अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक विभाग पनवेल येथील सर्व अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. ठाणे वाहतूक विभाग अधिक्षक दिगंबर प्रधान यांनी घटनास्थळी भेट दिली. सचिन सोनवलकर यांचा मृतदेह ताब्यात घेवून शवविच्छेदनासाठी नजिकच्या रुग्णालयात पाठविण्यात आला. याबाबत अधिक तपास पनवेल तालुका पोलीस ठाणे व महामार्ग पोलीस करीत आहेत.
दोन वाहनांमध्ये झालेल्या अपघातात पोलीस कर्मचारी सचिन सोनवलकर यांना आपला जीव गमवावा लागल्याने पोलीस दलावर व दुधेबावी गावावर शोककळा पसरली आहे.
Previous Post Next Post