खंडणीच्या गुन्ह्यातील एक वनकर्मचारी बोरगाव पोलिसांकडून अटक 

 

स्थैर्य, सातारा, दि.२३ : पिरेवाडी (ता.सातारा) येथील युवकाला शिकारीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत त्याच्याकडून पंचवीस हजार रुपये उकळल्याप्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल झालेल्या चार वनकर्मचार्यांपैकी एकाला बोरगाव पोलिसांनी बुधवारी रात्री ताब्यात घेतले.महेश साहेबराव सोनवले ( वय.२८,रा.घोट,ता.पाटण) असे या वनकर्मचाऱ्याचे नाव आहे.गुरुवारी त्याला जिल्हा न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला २६ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.या प्रकरणातील वनपालासह अन्य दोन वनसंरक्षक अद्याप पोलिसांना गुंगारा देत आहेत. पिकांचे संरक्षण करण्यासाठी गेलेल्या पिरेवाडी येथील ओंकार शामराव शिंदे या युवकाला वनविभागाच्या चार कर्मचाऱ्यांनी शिकारीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत त्याच्याकडून पंचवीस हजार रुपये उकळले होते.ही घटना ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली होती.याची तक्रार ओंकार शिंदे याने ५ सप्टेंबरमध्ये बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल केली होती.पोलिसांनी वनपाल योगेश पुनाजी गावित,वनसंरक्षक महेश साहेबराव सोनवले,रणजित व्यंकटराव काकडे, किशोर ज्ञानदेव ढाणे या चौघांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला होता.गुन्हा दाखल झाल्यापासून हे चौघेही पोलिसांना गुंगारा देत होते. याचदरम्यान त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला होता तर उच्च न्यायालयात जामीन अर्ज फेटाळणार हे लक्षात येताच संशयितांनी अर्ज मागे काढून घेतला होता.अखेर बुधवारी सायंकाळी वनसंरक्षक महेश सोनवले याला बोरगाव पोलिसांनी ताब्यात घेतले.


Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya