सदानिकाधारकांची फसवणूक करून तीन वर्षे फरारअसलेल्या बांधकाम व्यवसायिक दाम्पत्यास अटक

 

स्थैर्य, खंडाळा, दि. २०: गृहप्रकल्पात सदानिका खरेदी करणार्‍या दोघांची आर्थिक फसवणुक करून तीन वर्षापासून फरारी असलेल्या बांधकाम व्यवसायिक व त्याच्या पत्नीला शिरवळ गुन्हे प्रकटीकरण शाखेने जेरबंद केले आहे. 

याबाबतची शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी पोपट दगडु जाधव रा. मिरजे, ता. खंडाळा, जि. सातारा व विजय लक्ष्मण मोहिते वय 37 रा. कोडोली, ता. कडेगाव, जि . सांगली यांनी सेवानिवृत्तीनंतर शिरवळ येथील बालाजी विश्‍व या गृह प्रकल्पामध्ये बांधकाम व्यावसायिक सुनिल देवराम तोटे व सौ. कल्पना सुनिल तोटे दोघे मुळ रा. ताडगाव, ता. हिंगणघाट, जि. वर्धा सध्या रा. वारजे, पुणे यांच्याकडुन अनुक्रमे 12 लाख 85 हजार व 17 लाख 05 हजार 900 रुपयांना प्रत्येकी एक सदनिका खरेदी केल्या होती. यावेळी सुनिल तोटे यांनी या दोन्ही सदनिका त्यांना विकण्यापुर्वी एका बँकेला तारण ठेवून त्यावर कर्ज काढले होते. ते कर्ज न फेडल्यामुळे संबधित बँकेने दोन्ही सदनिका जाधव व मोहिते यांच्याकडून ताब्यात घेऊन सील केल्या. यानंतर जाधव व मोहिते यांना फसवणुक झाल्याचे निदर्शनास आले. याबाबत त्यांनी शिरवळ पोलीस ठाणे येथे तक्रार दिल्यानंतर अपहार व फसवणुकीबाबतचे दोन स्वतंत्र गुन्हे नोंद करण्यात आले होते. दोन्ही गुन्हें 2017-18 मध्ये दाखल झाल्यापासून आरोपी दाम्पत्य फरारी झालेले होते. शिरवळ पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या वरील पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे गोपनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त करुन दोन्ही आरोपींना पुणे येथुन शिताफीने जेरबंद करुन वरील दोन्ही गुन्ह्यामध्ये अटक केली आहे. 

फसवणुक झालेल्यांपैकी एक माजी सैनिक आहेत. आरोपी सुनिल तोट प्रतिष्ठीत बांधकाम व्यावसायिक असून सह आरोपी असलेल्या त्यांच्या पत्नी कल्पना तोटे या शिक्षिका आहेत. दोन्ही आरोपींना खंडाळा न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची दोन दिवस पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार रविंद्र कदम हे करीत आहेत