एकनाथ खडसे पक्षांतराच्या तयारीत असताना चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य

 


स्थैर्य, कोल्हापूर, दि.१५: भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे घटस्थापनेच्या मुहूर्तावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा असली तरी भाजप अजूनही आशावादी आहे. एकनाथ खडसे यांच्या बाबतीत सर्व काही एक-दोन आठवड्यात सुरळीत होईल,' असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

पक्षानं सातत्यानं डावलल्यामुळं नाराज असलेले खडसे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. खडसे यांनी याबाबत अद्याप अधिकृत काही माहिती दिली नसली तरी त्यांच्या पक्षांतराची तयारी झाल्याचं बोललं जात आहे. राष्ट्रवादी प्रवेशाचा त्यांचा फॉर्म्युलाही निश्चित झाला आहे. त्यानुसार सुरुवातीला त्यांना पक्ष संघटनेत मोठी जबाबदारी दिली जाणार असून त्यानंतर विधान परिषदेची आमदारकी दिली जाणार आहे. त्यानंतर सरकारमध्ये एखादं महत्त्वाचं खातं दिलं जाणार असल्याची चर्चा आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी आज चंद्रकांत पाटील यांना खडसेंच्या पक्षांतराविषयी विचारले. त्यावर, असं काहीही होणार नसल्याचा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. 'एकनाथ खडसे यांच्याबाबत पक्षात सकारात्मक चर्चा सुरू आहे. एक दोन आठवड्यात सर्व सुरळीत होणार आहे. मी स्वतः नाथाभाऊंशी बोलतो आहे,' अशी माहिती पाटील यांनी दिली.

'एकनाथ खडसे हे पक्षाला खूप मानतात. तुम्ही मीडियातून बोलू नका अशी विनंती मी त्यांना केली आहे. त्यांनी देखील ते मान्य केलं आहे,' असं पाटील म्हणाले.

संजय राऊतांना टोला

मंदिरे उघडण्याच्या मुद्द्यावरून त्यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिणारे राज्यपाल कोश्यारी हे संविधानातील 'सेक्युलॅरिझम' मानत नाहीत का, असा प्रश्न राऊत यांनी केला होता. त्यावर, 'सर्वधर्मसमभावमध्ये हिंदू धर्म येत नाही का?,' असा प्रतिप्रश्न पाटील यांनी केला. 'आम्ही केवळ मंदिरं उघडा असं म्हटलं नाही. सगळीच प्रार्थनास्थळ उघडा अशी आमची मागणी आहे. संजय राऊत हे फार विद्वान आहेत,' असा टोला त्यांनी हाणला.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya