कॉ. वसंतराव आंबेकर - एक अवलियास्थैर्य, सातारा, दि. १६ : क्रांतिसिंह नाना पाटील ,कॉ. शेख काका यांच्या तालमीत तयार झालेले सातारचे सामाजिक , राजकीय घडामोडींवर आपल्या पद्धतीने भाष्य करणारे ,निर्भीड कार्यकर्ते ,  स्पष्टवक्ते असलेले कॉ वसंतराव आंबेकर. आज त्यांचा ४५ वा स्मृतीदिन. त्याबद्दल त्यांना व त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन.

 

संयुक्त महाराष्ट्र चळवळ असो त्याचबरोबर महागाई , भ्रष्टाचार , भाववाढ ,  राजकीय दृष्ट्या कोणावर अन्याय झालेला असो त्यावर स्पष्टपणे बोलणारे असे कॉ वसंतराव आंबेकर होते. त्यांच्या बद्दल बरंच लिहिता येईल. मात्र मी काहीच प्रसंग व आठवणी येथे सांगणार आहे.


खरेतर शाहीर अमर शेख ,  आचार्य अत्रे ,  क्रांतिसिंह नाना पाटील , कॉ एस.ए.डांगे , साथी एसेम जोशी , क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी , कॉ शेख काका, कॉ व्ही.एन पाटील, कॉ. नारायणराव माने, विठाबाई पवार ( लिंब ) बळवंतराव अंबवले , दत्तोबा वाकळे ,यांच्याबरोबर संयुक्त महाराष्ट्र चळवळीत कॉ वसंतराव आंबेकर हे सक्रिय सहभागी होते. सातारा येथील पोवई नाका भागात असलेल्या आंबेकर यांच्या जुन्या घरात ही सर्व नेते मंडळी आलेली आहेत. गुप्त बैठका झालेल्या आहेत. हे सर्व कॉ वसंतराव आंबेकर यांच्या पत्नी कमलाबाई व त्यांचे सर्व चिरंजिवांना  माहित आहे. अनेक गोष्टी वसंतराव आंबेकर यांच्या पत्नी श्रीमती कमलाबाई  सांगताना ते प्रसंग समोर जशेच्या तसे उभे राहत. हाच आपल्या पिढीला दिलेला वारसा असे म्हटले तरी चालेल.


आचार्य अत्रे यांचा कॉ वसंतराव आंबेकर यांच्यावर एवढा विश्वास होता की वसंतराव आंबेकर यांना त्यांनी सातारा जिल्ह्याचा मराठा दैनिकाचा वार्ताहर म्हणून नियुक्त केले होते. त्याचबरोबर आचार्य अत्रे यांची अनेक नाटके वसंतराव आंबेकर यांनी सातारा येथे खुल्या रंगमंच असलेल्या शाहू कलामंदिर येथे आणली होती


वसंतराव आंबेकर यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते स्पष्टवक्ते ,  निर्भीड व कोणालाही न घाबरणारे असे व्यक्तिमत्व होते. त्यांनी सातारा शहरात त्यावेळी इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा सोशल मीडिया नसताना सर्व जनतेपर्यंत आपले म्हणणे पोचवण्याचे साधन म्हणून सातारच्या पोवई नाक्यावर त्यांच्या घरासमोर एक फलक लिहिण्याचे काम सुरू केले होते. त्यावेळचे जनतेपर्यंत पोचविण्याचे हे माध्यम आगळे वेगळेच होते. *सातारा समाचार* या नावाने हा फलक जनतेला सर्व कळावे म्हणून लिहिला जायचा. त्यावर ते सातारा जिल्ह्यात घडणाऱ्या एका गोष्टीवर रोज लिहीत असत. एक बातमी सविस्तर लिहायचे नावानिशीवार लिहीत. न घाबरता लिहिल्याने ते वाचण्यासाठी सकाळपासूनच त्या फलकापाशी सातारकरांची गर्दी असायची. वसंतराव आंबेकरांनी यातून आपले वेगळे व्यक्तिमत्व व निर्भीड पत्रकारिता काय असावी हे दाखवून दिले होते. याबाबतची एकच माहिती याठिकाणी मी नमूद करू इच्छितो की त्या वेळी असलेले सातारा जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते यांनी वसंतराव आंबेकर यांना बोलावून घेतले होते. काही सांगण्याचा प्रयत्न केला होता. निमित्त होते सातारा समाचार या फलकावर सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक हा राजकीय अड्डा झाला असून त्यासंदर्भातील अनेक बाबी फलकावर स्पष्टपणे लिहिलेल्या होत्या. त्या फलकावरील मजकुरावरून त्याची चर्चा सातारभर झाल्याने त्या नेत्याने त्यांना बोलावून समजावून सांगितले. परंतु ऐकतील तर ते कॉम्रेड कसले ? त्यांनी दुसऱ्या दिवशी या चर्चेवेळी जो प्रसंग झाला तो तसाच्या तसा फलकावर लिहून त्यांना ऐकवलेले शब्द लिहिले ते शब्द म्हणजे " क्रांतिसिंह नाना पाटील यांनी आम्हाला जात शिकवली नाही." हा लिहिलेला फलकही वाचण्यासाठी अनेकांनी गर्दी केली. त्यानंतर मात्र त्या नेत्याने पुन्हा काही वसंतराव आंबेकर व त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर पंगा घेतला नाही.

भ्रष्टाचार, काळाबाजार करणारे , साठेबाज यांच्याविरोधात वसंतराव आंबेकर , नारायणराव माने दत्तोबा वाकळे यांनी एक मोहीमच उघडली होती.  ते साठेबाजांवर स्वतः धाडी टाकत. आणि धाडी टाकल्यानंतर जो गोंधळ होई त्यानंतर तिथे पोलीस येत व पोलीस पुढची कारवाई करत हा सपाटा त्यांनी साठेबाजां विरोधात सुरू केला होता. त्याला सर्वसामान्य जनतेने चांगलाच पाठिंबा दिला होता.


आंबेकर , माने व वाकळे यांना त्रिमूर्ती म्हणत असत या त्रिमूर्तींनी सलग दहा वर्षे आंदोलन करून जनजागृती करुन , लढे , मोर्चे ,  निवेदने देऊन ,  निदर्शने , कोपरा सभा घेऊन सातारा ला रेल्वे आणण्याचे मोठे काम केले‌ हे त्यांचे योगदान कोणीही विसरू शकत नाही 


सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत कॉम्रेड वसंतराव आंबेकर उभे असताना त्यांच्या वार्डात पोलीस लाईन येत होती. त्यावेळेच्या पोलीस प्रमुखांनी पोलीस लाईन मध्ये  प्रचाराला बंदी केली असताना तो बंदी आदेश बुडून क्रांतिसिंह नाना पाटील , कॉम्रेड शेख काका , नारायणराव माने ,कॉम्रेड वसंतराव आंबेकर यांनी सभा घेतली होती आणि पोलिसांनी अडथळा उभा केला होता तो मोडून टाकला होता. एवढी निर्भयता , सच्चेपणात असते हे त्यांनी दाखवून दिले.


अशा या थोर परंतु दुर्लक्षित अशा सच्चा समाज क्रांतिकारकास विनम्र अभिवादन 


विजय मांडके, सातारा

९८२२६५३५५८
Previous Post Next Post