घरांची पडझड; रस्ते पाण्यात; शेतीचे प्रचंड नुकसान

 


स्थैर्य, कराड, दि. 16 : कराड शहरासह तालुक्यातील दक्षिण व उत्तर विभागातकराड शहरासह संपूर्ण तालुक्यात वादळी वार्‍यासह पावसाने अक्षरशः थैमान घातले. तालुक्यात सरासरी 100.69 मिलीमीटर पाऊस झाला. नऊ मंडल विभागात पावसाने शतक गाठले तर चार मंडल विभागात 85 ते 90 मिलीमीटरच्या घरात पाऊस झाल्याने अनेक ठिकाणचे रस्ते पाण्यात गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली. या पावसाने शहर, परिसर व तालुक्यातील अनेक गावातील तळमजल्यातील दुकान गाळ्यांत तसेच घरांमध्ये पावसाचे पाणी शिरून नुकसान झाले. कराड-ओगलेवाडी रस्त्यावर कृष्णा कॅनॉल ते गजानन हौसिंग सोसायटीपर्यंत गुडघाभर पाणी साचल्याने तसेच गजानन हौसिंग सोसायटी ते एमएसईबीपर्यंतचा रस्त्याही पाण्याखाली गेल्याने येथील वाहतूक विस्कळीत झाली. या मार्गाची वाहतूक बनवडीमार्गे वळविण्यात आली. तालुक्यातील विविध गावांत घरांच्या पडझडीसह ऊस व काढणीस आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.


कराड तालुक्यात परतीच्या पावसाचा तडाखा त्याचा सर्वाधिक फटका शेतीला बसला आहे. काढणीला आलेली पिके हातची जाणार असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. काही ठिकाणी वादळी वार्‍यासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे ऊस, मका, ज्वारी, भात आदी पिके कोलमडून पडली आहेत. शेतात पाणी साचत असल्याने ही पिके कुजू लागली आहेत.  पावसाने विश्रांती घेतली असून  दुपारपर्यंत पावसाने थोडी उघडीप घेतली तरी कराड शहरासह तालुक्यात ढगाळ वातावरण कायम होते.


गेल्या दोन-तीन दिवसांपासून परतीच्या पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. काढणीला आलेली पिके हातची जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. पावसाने जनजीवनही विस्कळीत झालेे. दरम्यान, संततधार पावसामुळे रस्त्यांवरील पूल पाण्याखाली गेल्याने काही ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली होती. खरिपातील काढणीस आलेली सोयाबीन, भात, भुईमुगासह कडधान्य व तृणधान्याची पिके वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. ज्वारीलाही फटका बसला आहे. ज्वारीची कणसे पावसाने काळी पडली आहेत. काही ठिकाणी ऊस पिकासह भात आणि ज्वारीही भुईसपाट झाली आहे. कोथिंबीर, फ्लॉवर, कोबीमध्येही पाणी साचून नुकसान झाले. फ्लॉवर काळे पडले तर कारले, काकडीही भुईसपाट झाली आहे. पेरूच्या बागांचेही नुकसान झाले आहे. पावसाचे पाणी शेतात साचल्याने पिके कुजण्याच्या मार्गावर आहेत. हातातोंडाशी आलेली पिके वाया जाणार असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

कराडात दुकान गाळ्यांसह घरातही पाणी...दोन-तीन दिवसांच्या मुसळधार पावसाने कराड शहरातील सखल भागात व बुधवार पेठ, पोपटभाई पेट्रोल पंप आदी भागातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिले होते तसेच अनेक तळमजल्यातील दुकान गाळे तसेच अनेक घरांमध्ये देखील पावसाचे पाणी शिरून नुकसान झाले. सततच्या पावसाचा परिणाम बाजारपेठेवर झाला.


कराड-विटा रस्ता बंद..कराड-विटा रस्त्यावर नेहमीप्रमाणे पाणी साठून गुरुवारी रस्ता बंद झाला होता. पाण्याचा अंदाज नसल्याने वाहनचालक गाडी चालवत पाण्यात शिरत होते. गाडी बंद पडली की ढकलत आणत होते. येथील गजानन हौसिंग सोसायटी आणि तेथील परिसरातील व्यावसायिकांनी काही ठिकाणी आपल्या सोयीनुसार मोर्‍या बंद केल्यामुळे सतत पडणार्‍या पावसाचे पाणी वाट मिळेल त्या दिशेने मार्ग काढत घरामध्ये घुसत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.


कृष्णा कॅनॉलपासून ओगलेवाडी मळा वॉर्ड पर्यंतच्या रस्त्याच्या कडेच्या व अण्णासाहेब नांगरे नगर, गजानन हौसिंग सोसायटी व परिसरा-मधील अनेक घरात पुन्हा एकदा पाणी शिरल्याने अनेकांचे संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. घरात पाणी शिरल्याने त्यांना पावसाचा जोर कमी होईपर्यंत रात्र जागून काढावी लागली. येथील घरात पावसाचे पाणी शिरण्याची ही तिसरी वेळ आहे.  त्यामुळे रहिवाशांतून संताप व्यक्त होत आहे. तरी प्रशासनाने याची दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे.


घरांच्या पडझडीसह रस्त्यांचे नुकसान..दोन दिवसपासून सुरू असलेल्या या मुसळधार पावसाने कराड तालुक्यात बहुतांश ठिकाणी रस्त्यांची चाळण झाली तर सखल भागात पाणी साचल्याने वाहनधारकांची अडचण झाली. वादळी वार्‍यांसह पडलेल्या दोन दिवस पावसाने तालुक्यातील अनेक गावांत घरांचीही मोठी पडझड होवून धान्यासह संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसानही झाले आहे. खा. श्रीनिवास पाटील, पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी प्रशासनास तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई संंबंधितांना मिळण्याबाबतची कार्यवाही करण्याची सूचना केली आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या यांच्या सूचनेवरून कराड तालुक्यात महसूल विभागाच्यावतीने पंचनामे करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

टाळगाव येथे दुकानांचे लाखोंचे नुकसान.. दिवसभर व रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे टाळगाव येथील बस स्टँड लगत नव्याने उभारलेल्या नयनदीप अपार्टमेंटच्या तळभागातील दुकान गाळ्यात पाणी गेल्याने अनेक दुकानदारांचे साहित्य, माल भिजून सुमारे सात लाख रुपयांचे नुकसान झाले. कराड-रत्नागिरी राज्यमार्गाचे काम करताना अपार्टमेंट लगत रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. पण रस्त्यालगत असणारे नाले न काढल्याने रस्त्यावरील सर्व पाणी या अपार्टमेंटच्या तळभागांमध्ये असणार्‍या दुकान गाळ्यात शिरले. जवळपास पाच ते सहा फूट पाणी साचून राहिले. त्यामुळे दुकानांमधील साहित्याचे मोठे नुकसान झाले. यामध्ये अमेय मेडिकल या मेडिकलमधील गोळ्या-औषधे, संगणक, फ्रिज, आदीचे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. बन्सीलाल सपकाळ यांचे पशुखाद्य विक्रीचे दुकाने असून या दुकानातील खाद्याची 40 पोती भिजली आहेत. यामध्ये सुमारे 1 लाख 50 हजार रुपयांचे नुकसान झाले तर विश्‍वजित फर्निचर या दुकानातील फर्निचर, इलेक्ट्रिक मशीन, इलेक्ट्रिक मोटर भिजल्याने त्यांचे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सर्जेराव जाधव यांचे किराणा मालाचे दुकान आहे. या दुकानातील किराणा साहित्य सर्व भिजून लाखावर नुकसान झाले. त्याबरोबरच रचना स्टुडिओ, शिवम हेअर कटिंग या दुकानातील साहित्य पाण्यात भिजून नुकसान झाले आहे. या नुकसानीचा पंचनामा महसूल विभागाने केला आहे.


सुशिक्षित बेरोजगार युवकांनी कर्ज काढून या ठिकाणी भाड्याने व्यवसाय सुरू केला होता. पण पावसाने दुकानात पाणी साचल्याने साहित्याचे मोठे नुकसान झाल्याने नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी या युवकांनी केली आहे. कराड-रत्नागिरी रस्त्याचे काम सुरू असून गटाराचे अपुर्‍या कामाचा फटका बसला असल्याचा आरोप गाळेधारकांनी केला आहे Previous Post Next Post