घटस्थापना आणि नवरात्रोत्सवानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभेच्छा

 

स्थैर्य, मुंबई, दि. १६: भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या, देवीरुपातील स्त्रीशक्तीचे दररोज पूजन होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाची उद्यापासून सुरुवात होत असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला घटस्थापना व नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा नवरात्रोत्सव साजरा करताना सोशल डिस्टन्सिंग, कोरोनाप्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन होईल, यंदाचा नवरात्रोत्सव साधेपणाने व शक्यतो घरीच साजरा होईल, अशी अपेक्षा व्यक्त करीत नागरिकांनी, देवीभक्तांनी उत्सवकाळात स्वत:ला, कुटुंबाला, समाजाला कोरोनाची लागण होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

घटस्थापना व नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, नवरात्रोत्सव हा स्त्रीशक्तीचे पूजन करण्याचा उत्सव. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने श्रीदुर्गामाता, श्रीअंबामाता, श्रीरेणुकामाता, श्रीलक्ष्मी, श्रीसरस्वती आदी रुपातील स्त्रीशक्तीचे पूजन करताना आपल्या कुटुंबातील, गावातील, शहरातील, समाजातील माता-भगिनींचाही सन्मान वाढवण्याचे काम झाले पाहिजे. माता-भगिनींना त्यांचा हक्क, न्याय, सन्मान मिळेल, त्यांच्यावर अन्याय होणार नाही आणि होऊ देणार नाही, असा संकल्प आजच्या घटस्थापनेच्या निमित्ताने करुया, असेही उपमुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.
Previous Post Next Post