कोविडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून फडतरवाडी ग्रामस्थ आणि प्रशासनाने एकत्र येवून माझे कुटुंब, माझी जबाबदारी या अभियानांतर्गत गावात विशेष आरोग्य तपासणी मोहिम यशस्वी करुन इतर गावांसमोर एक नवा आदर्श ठेवला

 


स्थैर्य, फलटण, दि. ३: कोविडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून फडतरवाडी ग्रामस्थ आणि प्रशासनाने एकत्र येवून माझे कुटुंब, माझी जबाबदारी या अभियानांतर्गत गावात विशेष आरोग्य तपासणी मोहिम यशस्वी करुन इतर गावांसमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. तालुक्यातील सर्वच गावांनी या पध्दतीने एकजुटीने काम केल्यास कोरोना नियंत्रणासह अन्य सार्वजनिक कार्यक्रम उपक्रम सहज यशस्वी करता येतील असा विश्‍वास इन्सिडंन्ट कमांडर तथा प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी व्यक्त केला आहे.

माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही राज्य शासनाची महत्वाकांक्षी योजना संपूर्ण राज्यभर राबविण्यात येत असताना फडतरवाडी ता. फलटण येथे कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून ग्रामस्थांनी प्रशासनाच्या सहकार्याने गावात आरोग्य तपासणी विशेष मोहिम राबविली त्यामध्ये सुमारे 97 वयोवृध्द व विविध आजार असलेल्या व्यक्तींचे टेेंम्प्रेचर व ऑक्सिजन सेच्युरेशन तपासल्यानंतर 21 व्यक्ती कोविड संशयित म्हणून तपाणीसाठी निवडण्यात आल्या या कँम्पमध्ये करण्यात आलेल्या कोविड चाचणीमध्ये त्यापैकी 7 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्याचे निदर्शनास आणून देत वास्तविक या कँम्पच्या माध्यमातून तपासण्या झाल्या नसत्या तर या 7 व्यक्तींना कोविडची बाधा झाल्याचे उशीरा लक्षात आल्याने व वेळेत उपचार न मिळाल्याने गंभीर परिस्थिती निर्माण होण्याचा धोका प्रशासन व ग्रामस्थांच्या एकजुटीतून टळला आहे. अन्य गावांनीही याच पध्दतीने पुढे येवून कोरोना नियंत्रणामध्ये आघाडी घ्यावी असे आवाहन प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी केले आहे.

गत सप्ताहात फडतरवाडी मध्ये एकूण कोरोना रुग्ण संख्या 47 आणि अ‍ॅक्टीव्ह रुग्ण संख्या 32 होती. या गावात कोरोनामुळे दुर्दैवी निधन झालेल्या व्यक्तींची संख्या 3 होती त्या पार्श्‍वभूमीवर कोरोना साखळी तोडणे व कोणाचाही मृत्यू होणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी गावातील वयोवृध्द व विविध आजार असणार्‍या व्यक्तींची आरोग्य तपासणी आणि कोरोना चाचणी तातडीने करुन लवकर निदान होण्याची आवश्यकता लक्षात घेवून तेथे विशेष आरोग्य तपासणी मोहिम राबवून कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यातून वरीलप्रमाणे बाधित रुग्ण समोर आल्याचे प्रांताधिकार्‍यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांच्या आवाहनानुसार आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी मोहिमेत महसुल मंडलाधिकारी भांगे, साखरवाडी प्रा. आरोग्य केंद्राचे अडसुळ, पोलीस पाटील शांताराम काळेल पाटील, तलाठी दिपक नलगे, ग्रामसेवक काळेल, आरोग्य सेवक साळुंखे, आरोग्य सेविका सौ. पिंगळे माजी सरपंच संतोष शेंडगे व ग्रामस्थांनी सदर आरोग्य मोहिम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya