‘एनसीबी’चे उपसंचालक केपीएस मल्होत्रा यांना कोरोना

 

स्थैर्य, मुंबई, दि.४: बॉलिवूडमध्ये ड्रग सिंडिकेटच्या सध्या सुरू असलेल्या चौकशीत कोरोनाचा शिरकाव झाला आहे. नॉर्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) उपसंचालक केपीएस मल्होत्रा यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर केपीएस मल्होत्रा मुंबईहून दिल्लीला परतले आहेत.

दरम्यान, अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर अनेक बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार एनसीबीच्या रडारवर आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी ड्रग्ज प्रकरणी अभिनेत्री दीपिका पादुकोण हिला एनसीबीने चौकशीसाठी बोलावले होते. एनसीबी एसआयटी टीमने दीपिका पादुकोणची बराच वेळ चौकशी केली होती. या टीमचे नेतृत्व केपीएस मल्होत्रा करीत आहेत.

दीपिका पादुकोण हिची २६ सप्टेंबरला जवळपास साडे-पाच तास चौकशी करण्यात आली. यावेळी तिला सुशांतसिंह राजपूत किंवा रियाशी संबंधित कोणताही प्रश्न चौकशीत विचारला गेला नाही. एनसीबीचे संपूर्ण लक्ष दीपिकाच्या करिश्माच्या चॅटवर होते, ज्यात ती ड्रग्जबद्दल बोलत होती. तसेच, दीपिकानेही त्या चॅट संदर्भात एक मोठा कबुलीजबाब दिला आहे. ज्या चॅटमध्ये ड्रग्सविषयी बोलले जात होते. त्याचाच तो एक भाग आहे, असे दीपिकाने कबूल केल्याचे म्हटले जाते.

एनसीबीची टीम ज्यावेळी दीपिकाची चौकशी करत होती. त्यावेळी दीपिकाला तीनवेळा अश्रू अनावर झाले. त्यानंतर एनसीबी अधिका-यांनी तिला इमोशनल कार्डे न खेळण्याचा सल्ला दिला होता. तसेच, जर ती सर्व काही सत्य सांगत असेल तर तिच्यासाठी ते अधिक चांगले राहील, असे दीपिकाला सांगण्यात आले होते.
Previous Post Next Post