देवेंद्र फडणवीस यांनी राज्याची सूत्रे हाती घ्यावीत : खा. उदयनराजे भोसले 


स्थैर्य, सातारा, दि.२२: राजकारणापलिकडे जावून सर्वसामान्य लोकांचा विचार झाला पाहिजे, असे विचार करणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याची सूत्रे हाती घ्यावीत, असं वक्तव्य खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केले. 

विरोधीपक्षनेेते प्रवीण दरेकर यांनी आज सकाळी सातारा येथे जलमंदिर या निवासस्थानी खासदार श्री.छ.उदयनराजे यांची भेट घेवून त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर उदयनराजे माध्यमांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले, आज प्रत्येकजण दिशाहीन झाल्याचे पहायला मिळत आहे. पुरेसे संख्याबळ असतानाही केवळ राजकारण करावयचे म्हणून राज्यात वेगवेगळ्या विचारांची लोक एकत्र येत आहेत. विचार वेगळे असल्यामुळे निर्णायक निर्णय घेता येत नाहीत. दुसरीकडे हेतू साध्य झाल्यानंतर ते आपापल्या दिशेने निघून जातात. मात्र काही नेते लोकांचे काही हिताचे उदिष्ठ मनात बाळगून काम करतात. ते नेहमीच एकत्रित राहतात. नजिकच्या काळात महाराष्ट्रात वेगळे चित्र पहायला मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूत्रे हातात घ्यावीत. अशी अपेक्षा उदयनराजे यांनी व्यक्त केली.

विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर हे माझे मित्र आहेत. आमच्यात नेहमीच चर्चा होत असते त्यांनी आज माझ्यानिवासस्थानी भेट दिल्याने बरे वाटल्याचे सांगून प्रविण दरेकर हे विरोधीपक्षनेते म्हणून उत्तम कामकाज करत आहेत, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya