ग्रामसेवक बदलीच्या घोळात नागरी सुविधांचा बोजवारा

 

येथील मातंग वस्तीनजीक गटार तुंबल्यामुळे रस्त्यावर आलेले पाणी

स्थैर्य, कातरखटाव, दि. ०२ : वाकेश्वर (ता. खटाव) येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक बदलीच्या घोळात नागरी सेवा सुविधांचा पुर्ण बोजवारा उडाला आहे. वरीष्ठांनी तातडीने दखल घेवून योग्य त्या सुधारणा न केल्यास ग्रामस्थ आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.


याबाबत अधिक माहिती अशी, वाकेश्वरचे ग्रामसेवक एल. व्ही. चिंचकर यांची नऊ महिन्यापूर्वी मांडवे येथे बदली झाली होती. त्यांच्या जागी अंभेरी, कोकराळे येथील ग्रामसेवक सोमनाथ सावंत यांची नियुक्ती करण्यात आली होती. बदलीचे आदेश होवूनसुध्दा मार्च एंडींग व इतर तांत्रिक कारणावरुन चार्ज देवाण घेवाणीस चार महिन्याचा कालावधी गेला. तद्नंतर सावंत यांच्याकडे एकदाशी चार्ज आला. त्यांनी पहिल्याच महिन्यात स्वत:च्या अधिकारात लेखनिकाची नियुक्ती केली. बदलीचा घनश्या घोळ व कोरोना परस्थितीमुळे कर वसुलीची पुर्ण बोंबाबोंब झाली आहे. एका बाजूला वसूली कमी असल्यामुळे पाणीपुरवठा कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी यांचे वेतन रखडले आहे. तर दुसर्‍या बाजूला नवीन नेमलेल्या लेखनिकाचा पहिल्याच महिन्यात पगार झाल्यामुळे मुळच्या दोन कर्मचार्‍यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. अश्या परस्थितीत त्यांनी जेमतेम काम सुरु ठेवले आहे. त्यामुळे काही ठिकाणी गटर तुंबले आहेत. मातंग वस्तीनजीक चेंबर ब्लॉक झाल्यामुळे गटराच्या पाण्याने रस्त्याकडे वाट वळविली आहे. या प्रकारामुळे मातंग वस्तीवरील नागरीक तसेच दैनंदिन वाहतुक करणार्‍या नागरीकांना नरकयातना सहन कराव्या लागत आहेत. त्याचबरोबर दलीत वस्ती योजनेतून लाखो रुपये खर्च टाकलेल्या रस्त्याचे वाटोळे होण्यास वेळ लागणार नाही. तर मंदीर परीसरातील तत्कालीन खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या निधीतून मंजूर झालेला हायमास पोल तसेच स्मशानभूमी नजीकचा हायमास लाईट गेली काही महिने बंद असल्यामुळे हे दोन्ही शोपीस ठरले आहेत. दरम्यानच्या काळात ग्रामसेवक श्री. सावंत यांची प्रकृती बिघडल्याने त्यांचा कार्यभार पुन्हा श्री. चिंचकर यांच्याकडे देण्यात आला आहे.


तरी वरील प्रकारासंदर्भात पंचायत समितीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी तात्काळ उपाय योजना न केल्यास कामचुकार ग्रामसेवक तसेच त्यांना पाठीशी घालणार्‍या अधिकार्‍यांविरोधात जिल्हा परिषद मुख्याधिकार्‍यांच्याकडे लेखी तक्रार करण्याबरोबरच तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वि.का.स.सेवा सोसायटीचे माजी उपाध्यक्ष शिवाजीराव साठे, युवा कार्यकर्ते सुरज भांडवलकर यांनी दिला आहे.

पिसेंनी तत्परता दाखवली पण ...

वरील प्रकाराबाबत प्रशासक तथा शिक्षण विस्तार अधिकारी लक्ष्मणराव पिसे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी तातडीने या गोष्टीची ग्रामसेवकांना कल्पना दिली. पण अजून सह्याचे अधिकार नाहीत. कर्मचार्‍यांना सांगीतले आहे. असे सांगत ग्रामसेवक वेळकाढूपणाचे धोरण अवलंबत आहेत.


 


Previous Post Next Post