कोरोना रुग्णसंख्या घटली तरी बेसावध राहू नका : मोदी

 स्थैर्य, नवी दिल्ली, दि.१८: देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्यामुळे कोणीही बेसावध राहू नये. ही साथ आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्याची गरज आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन दिवसांत दुस-यांदा कोरोनाची परिस्थिती व संभाव्य लसींच्या व्यवस्थापनाचा आढावा घेतला. कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध झाल्यानंतर त्वरित लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, या दृष्टीने तयारी करण्याची सूचना मोदींनी केली आहे.

कोरोना लस वितरणासाठी राज्य सरकारच्या शिफारशींनुसार नॅशनल एक्सपर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सिन अ‍ॅडमिनिस्ट्रेशन आणि इतर सर्व संबंधितांनी लस साठवण, वितरण आणि लस टोचणे याबाबत सविस्तर आराखडा तयार केला आहे. राज्य सरकारच्या सुचनांनुसार तज्ज्ञांचं पथक लस देण्याचा प्राधान्यक्रम आणि लस वितरण यावर सक्रियपणे काम करत आहे, अशी माहिती मोदी यांनी दिली. लॉजिस्टिक्स, वितरण आणि व्यवस्थापन अशा प्रत्येक टप्प्यावर कठोर अंमलबजावणी व्हावी, असंही सांगण्यात आलं आहे. यात शीतगृहं, वितरण नेटवर्क, निरिक्षण तंत्र आणि आवश्यक उपकरणं यांची तयारी करण्यावर भर देण्यास मोदींनी सांगितले आहे.

भारतासारख्या मोठ्या देशामध्ये लस लोकांपर्यंत पोहोचणे हेच मोठे आव्हान असल्याने राष्ट्रीय तज्ज्ञ गटाकडून पंतप्रधान सातत्याने माहिती घेत आहेत. लसींचे वितरण आणि वाटप या दोन्ही प्रक्रियेला गती देण्यात आली आहे.

लसीकरणाचे प्राधान्यक्रम आणि लसींचे वितरण या दोन प्रमुख मुद्यांवर राज्यांशी चर्चा करण्यात आली आहे. डॉक्टर, परिचारक व अन्य आरोग्यसेवक, पोलीस आदी कोरोनायोद्धे, सफाई कामगार ज्येष्ठ नागरिक आणि गंभीर आजार असलेल्या व्यक्ती असे चार प्राधान्यक्रम गट केले जाणार असून ३० कोटी लोकांचे पहिल्यांदा लसीकरण केले जाणार आहे.

देशभर एकाचवेळी निवडणुकीची प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली जाते. त्यासाठी अवाढव्य यंत्रणा राबवली जाते तशीच यंत्रणा लसीकरणासाठी राबवावी लागणार असल्याने निवडणूक आयोगाचा अनुभवही उपयुक्त ठरू शकेल, असे या बैठकीत सांगण्यात आले.

दोन लसींच्या चाचण्या दुस-या टप्प्यात

भारत बायोटेक, आयसीएमआरच्या संयुक्त प्रयत्नातून देशात बनणारी कोव्हॅक्सिन व झायडस-कॅडिलाच्या लसीच्या मानवी चाचण्यांचा दुसरा टप्पा तर सिरम-अ‍ॅस्ट्रोझेनिसा बनवत असलेल्या कोव्हिशिल्ड या लसीच्या मानवी चाचण्यांचा तिसरा टप्पा सध्या सुरू असल्याची माहितीही या बैठकीत देण्यात आली.

रेमडेसिवीरच्या वापरावर बारीक लक्ष

रेमडेसिवीरमुळे कोरोना रुग्ण लवकर बरा होतो या गोष्टीत तथ्य नाही असे जागतिक आरोग्य संघटनेने नुकतेच जाहीर केल्याने भारतातही रेमडेसिवीरच्या उपयोगाबाबत औषध नियंत्रक यंत्रणा आता बारीक लक्ष ठेवून आहे. रेमडेसिवीर अनेक देशांत अव्वाच्या सव्वा किमतीला विकले जात आहे.

रशियाच्या ‘स्पुटनिक-व्ही’ची दुस-या, तिस-या टप्प्यातील चाचणी भारतात

रशियाने कोरोनावरील स्पुटनिक व्ही ही लस तयार केली आहे. रशियाने १२ ऑगस्टला लसीची तिस-या टप्प्यातील चाचणी पूर्ण होण्याआधीच मंजुरी दिली. रशियाने तयार केलेल्या कोरोनावरील स्पुटनिक व्ही लसीच्या दुस-या आणि तिस-या टप्प्यातील क्लिनिकल चाचणी लवकरच भारतात होण्याची शक्यता आहे. यासाठी ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने भारतातील फार्मा कंपनी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजला मान्यता दिली आहे.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya