नाटक असं असतं राजा..नाटक असं असतं!!

 


साताऱ्याच्या मधूमिता नाट्य संस्थेच्या नाटकाची बसगाडी सर्व कलावंतांना घेऊन नाटकाच्या प्रयोगाला निघालीय आणि त्याच नाटकात आईची भूमिका साकारणा-या, पण व्यवसायाने एका शाळेत शिक्षिका असणाऱ्या महाडिक मॅडम या प्रचंड आजारी आहेत.  सुदैवाने त्यांचा मुलगा आणि एक मैत्रीण देखील सोबतीला आहे, त्यांची प्रवासात काळजी घेत आहेत. आणि अचानक मॅडमची दातखिळी बसते. त्यांचा मुलगा ती काढण्याचा प्रयत्न करतोय पण त्या काहीच प्रतिसाद देत नाहीत. ते दृश्य पाहून सर्वांचेच धाबे दणाणले आहे. गोंदवले येथे त्याच दिवशी संध्याकाळी 'नाथ हा माझा' या नाटकाचा प्रयोग आणि हे संकट अचानक उभे राहिले आहे. गेले चार दिवस त्यांची तब्येत बरी नसतानाही इंजेक्शन घेऊन त्या तालमीला उभ्या राहात होत्या पण आज मात्र शरीराने असहकार पुकारला. पाऊस, रात्रीचे जागरण, अवेळी, उशिरा जेवणे यामुळे त्यांची प्रकृती जास्तच बिघडली होती. दरम्यान रस्त्याला लागून असणाऱ्या एका ओपीडी मध्ये डॉक्टरांनी उपचार सुरू केले खरे पण त्या काम करू शकणार नाहीत हे जवळजवळ स्पष्ट होते. 'शो मस्ट गो ऑन' या उक्तीप्रमाणे हातात असलेल्या पाच-सहा तासात दुस-या कलावंताकडून भूमिका करवून घेणे किंवा नाटक रद्द करणे हे दोनच पर्याय 'मधूमिता' चे निर्माते, दिग्दर्शक व अभिनेता या सर्व आघाड्यांवर काम करणाऱ्या श्री. अभिजित वाईकर सर यांचेसमोर होते. मधुमिताचे प्रमुख अभिजित सर यांची त्या प्रवासात सोबत असणारी आई, पत्नी आणि महाविद्यालयात शिकणारी मुलगी 'मधूमिता' अशा तिघिनीही ही भूमिका ऐनवेळी करण्याची तयारी दाखवली. तशी तयारीला सुरुवात देखील झाली, पण हे कानावर पडताच डॉक्टरी उपचार घेता-घेताच महाडिक मॅडम म्हणाल्या, " काहीही झाले तरी मी स्टेजवर उभी राहणार आणि आपले नाटक होणार ! "

मनाची ताकद काय प्रचंड असते.....रात्री मॅडम नुसत्या उभ्या राहिल्या नाहीत तर ताकदीने भूमिका उभी केली. प्रचंड टाळ्या आणि शिट्या यांच्या गजरात प्रयोग संपला. इतकेच नव्हे तर या नाटकाने सर्वोत्कृष्ठ नाटकाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले , सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन व पुरुष आणि स्त्री अभिनयाची प्रथम क्रमांकाची पारितोषिकेही पटकावली. 


सातारच्या 'मधूमिता' नाट्यसंस्थेच्या अभिजित वाईकर आणि त्यांच्या नवोदित टीमने 'नाथ हा माझा' च्या रूपाने व्यावसायिक रंगभूमीवर पहिले पाऊल ठेवले आहे. गोंदवले येथे बक्षिसांचा वर्षाव झाल्यावर संस्थेने तिकीट लावून सातारच्या शाहू कलामंदिर मध्ये प्रयोग लावला आणि हा प्रयोग जवळजवळ हाऊसफुल्ल गेला. अर्थात अडचणींची मालिका पुढे चालूच होती. सातारच्या प्रयोगाच्या आधी एक दिवस एका कलावंताच्या घरून त्या तरुण कलावंताच्या आईचा सरांना फोन आला आणि इतकेच सांगितले गेले की 'त्याची तब्येत बिघडली आहे त्यामुळे तो उद्या प्रयोग करू शकणार नाही.' फोन कट केला गेला. आता ऐनवेळी दुसरा  कलावंत उभा करायचा याहीपेक्षा कोणतेही कारण नसताना एखाद्याने अचानक प्रयोग सोडून निघून जाणे हे किती क्लेशकारक असते याचा अनुभव सर्वांजण घेत होते. त्या भूमिकेसाठी ऐनवेळी खात्रीचा कलावंत म्हणजे वनराज कुमकर. त्यांनी होकार दिला  ते कोणतीही भूमिका समरसून आणि न चुकता करतात. पण त्यांच्याकडे रंगभूषेची जबाबदारी असल्याने ओंकार ताटे या कलावंताने एक भूमिका करत असतानाही हीसुद्धा भूमिका करण्याची तयारी दाखवली. आणि ऐनवेळी वेषभूषा, केशभूषा आणि बोलण्याची ढब बदलून त्याने ती निभावलीही. फक्त नाटकात भूमिकाच नाही तर ओम नेपथ्याची जबाबदारीही तेवढ्याच ताकदीने संभाळत होता हे नाटकाचे देखणे नेपथ्य पाहिल्यावर लक्षात येते.


नाटक हे जगणे शिकवत असते आणि कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची शक्ती देत असते. साता-यातील प्रचंड यशानंतर लगेचच 2 दिवसात नाटकाला नाट्यस्पर्धेचा प्रयोग मिळाला होता.. अहमदनगर जिल्ह्यातील देवी भोयरे या गावात. संपूर्ण टीम तिथे पोहोचली. पण अगोदरचा काव्यसम्मेलनाचा एक कार्यक्रम लांबल्याने जवळजवळ तीन तास उशिरा नाटक सुरू झाले. 7 ला मेकअप करून तयार असलेले कलाकार 10.30 ला स्टेजवर उतरले.  त्यात त्यादिवशी गावातील एका पुढा-याने महिलांची विनामूल्य सहल आयोजित केल्याने जवळजवळ सर्व महिलावर्ग निघून गेला होता. त्यामुळे जे रसिक समोर होते त्यांच्यासमोर नाटक सुरू केले. पण लाईट जाणे, जनरेटरची व्यवस्था नसणे यासारख्या गोष्टींमुळे प्रयोग लांबत गेला आणि रात्री दोन वाजता संपला. त्यावेळी समोर परीक्षक, 15 ते 20 रसिक व एकच संयोजक उपस्थित होते. नंतर सारे गाव गाढ झोपी गेले. संयोजकानेही फॉर्मलिटीज पूर्ण करून घरचा रस्ता पकडला. कलावंतांना मेकअप उतरवायला सुद्धा पाणी मिळाले नाही. मंडळी रात्री 2 ते 3 च्या सुमारास चक्क प्रत्येक घराबाहेरील बॅरल मध्ये पुरेसे पाणी सापडते का या शोधात फिरत होती त्या झोपी गेलेल्या गावातून.. . अखेर त्याच अवस्थेत आठ तासांचा प्रवास करून मंडळी साता-यात परतली. आणि मग चेहऱ्यावरचा मेकअप उतरवला.  अगोदरच्या प्रयोगाला आठशेच्या वर रसिक होते तर त्यापुढच्याच प्रयोगाला केवळ पाच-पंचवीस ! तरीही त्याच एनर्जीने कलाकारांनी कला सादर केली होती. त्याचे फळ पुन्हा एकदा सर्वाना मिळाले. निकाल जाहीर झाला.


देवी भोयरे येथील नाट्यस्पर्धेत  पुन्हा एकदा 'नाथ हा माझा' ने बाजी मारली. संपूर्ण नाटकाला सांघिक तृतीय पारितोषिकांबरोबरच अभिनयाची तीनही बक्षिसे मिळाली. पुन्हा स्त्री अभिनय प्रथम व पुरुष अभिनय, दिग्दर्शन, विनोदी अभिनेता इत्यादी बक्षिसे काखोटीला मारून ही टीम पुढच्या प्रयोगाच्या तयारीला देखील लागलीय.


हे सर्व वाचून तुम्हाला वि वा शिरवाडकरांच्या नटसम्राट मधील " नाटक असं असतं राजा, नाटक असं असतं ! " या वाक्याची आठवण न झाली तरच नवल ! 

कै. मधुसूदन कालेलकर यांचे १९७८ साली रंगभूमीवर आलेले हे 'नाथ हा माझा' हे नाटक म्हणजे मराठी रंगभूमीवरील मैलाचा दगड ठरले. त्यातील सुभानरावाची भूमिका कै. यशवंत दत्त आणि नंतर मोहन जोशी यांनी साकारली तर बारक्याची व विनयकुमारची विनोदी भूमिका लक्ष्मीकांत बेर्डे आणि विजय कदम यांनी साकारली होती. या नाटकावर 'घाबरायचं नाय!' नावाचा चित्रपट देखील येऊन गेला होता ज्यात यशवंत दत्त यांच्यासोबत प्रथमच रेखा राव या देखण्या अभिनेत्रीचे पडद्यावर पदार्पण झाले होते. कधीही कितीही वेळा पाहिले तरी कंटाळा न येणा-या या नाटकाचे शिवधनुष्य 'मधुमिता' नाट्यसंस्थेने उचलले आणि ते यशस्वीपणे पेलले. 


एक सांगू का ? आपल्या मनाची, संयमाची आणि आपल्या सामर्थ्याची जर खरोखर परीक्षा घ्यायची असेल तर तुम्ही एकच करू शकता... 'एखादे नाटक करायला घेऊ शकता.' त्यासाठी सर्वप्रथम एखादं नाटक निवडा.


.. मग लागणारे योग्य ते कलावंत निवडा..

एक जागा निवडा...प्रॅक्टिस सुरू करा..


कलावंतांचे रुसवे-फुगवे, त्यांची गैरहजेरी भांडणावर मात करा..एखादा कलावंत आला नाही त्याला दुसरा पर्याय शोधा....रोजच्या प्रॅक्टीसला येण्यासाठी सर्व कलावंतांची रोज फोनवर मनधरणी करा...तरीही प्रॅक्टिस कधीही वेळेवर सुरू होणार नाही याची खात्री बाळगा. मग प्रॅक्टिस संपायला उशीर झाला तर नाटकात काम करत असलेल्या स्त्री कलाकारांच्या घरच्या लोकांची मनधरणी करा....त्यांना सेलिब्रेटीसारखी वागणूक द्या. सेट, संगीत, लाईट, मेकअप, रोजचा नाश्ता आणि लागेल तेवढा चहा यासाठी आपला स्वतःचा खिसा खाली करा....


एवढे सगळे सहन केल्यानंतर जेव्हा नाटकाचा दिवस उजाडेल तेव्हा नाटकात असलेल्या वस्तू वेळेवर जिथल्यातिथे सापडाव्यात म्हणून व्यवस्थित ठेवा. स्वतःच बॅकस्टेज आणि ऑनस्टेजची जबाबदारी सांभाळा. इतके करूनही प्रयोग झालाच सुरू कसा तरी वेळेवर तरी नष्टचर्य संपत नाही. कारण काही कलाकार संवाद विसरतात, दुसऱ्याचे संवाद खातात, वस्तूंची अदलाबदल होते, लाईटवाले गोंधळ करतात म्युझिक नको तेव्हा आणि नकोतिथे वाजते आणि पाहिजे तेव्हा वाचत नाही.  म्युझिक, लाईट च्या समोर कलावंतांच्या जागा चुकतात आणि अशा असंख्य गोष्टी चुकतात पण त्या सगळ्या सांभाळून घेऊन तुम्ही जेव्हा नाटकाचा प्रयोग यशस्वीरित्या पूर्ण करता तेव्हा तुम्हाला शांततेचे नोबेल पारितोषिक द्यावे असे वाटू लागते. हुशशsssss संपलं बुवा एकदाच !

 पण नाटक ही अशी कला आहे की इतका त्रास होऊनही शेवटचा पडदा पडतो तेंव्हा सर्व कष्ट विसरले जातात आणि पुढच्या प्रयोगाची तयारी केंव्हा सुरू करायची हे तिथेच ठरवले जाते.


अभिजित वाईकर हे सातारच्या नाट्यक्षेत्रातले उमदे आणि बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. त्यांनी स्वतः वर उल्लेखलेला त्रास सक्त भोगलेला आहे. पण नाटक करणे सोडले नाही. ते लेखक, दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते अशा सर्व आघाड्यांवर काम करतात. स्वतः 5 नाटकं लिहिली आहेत. लेखन, दिग्दर्शन व अभिनयाचे अनेक पुरस्कार त्यांच्या घरातील कपाटात दाटीवाटीने झळकताहेत. मुंबईच्या अभिषेक थिएटर्स व मराठी नाट्यसमूह यांच्यावतीने नुकतीच एक नाट्यलेखन स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध शहरातून आलेल्या विविध लेखकांच्या ९६ संहितांमधून अंतिम १० संहिता निवडल्या गेल्या. त्यात अभिजित वाईकर यांनी लिहिलेल्या  'कधी उलट कधी सुलट' या व्यावसायिक दर्जाच्या नाटकाला उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून चंद्रकांत कुलकर्णी, अभिराम भडकमकर, प्रशांत दामले, जयंत पवार, पुरुषोत्तम बेर्डे व इतर ज्येष्ठ रंगकर्मी होते.


खरे तर अभिजित सर हे चित्रकार आहेत. सातारच्या लोकमंगल शिक्षण संस्थेच्या लोकमंगल हायस्कुल शाळेत कलाशिक्षक आहेत. श्री. शिरीष चिटणीस यांनी स्थापन केलेल्या या शाळेत अत्यंत सामान्य आर्थिक स्थितीतील मुले शिकतात. वाईकर सर त्यांच्यातूनच घासून-घासून कलाकार घडवतात. दरवर्षी शाळेचे बालनाट्य पुण्यात भरत नाट्य मंदिरात किंवा टिळक स्मारक ला असते. नाटकातील 'न' देखील माहीत नसलेल्या 'नवोदितांकडून' एक उत्कृष्ट, बक्षीसपात्र, लोकांना आवडणारे नाटक उभे करणे हा त्यांचा छंद आहे. सरांच्या तालमीत तयार झालेले बरेच 'बाल'कलाकार व नवोदित आज वेगवेगळ्या वेबसिरीज, टीव्ही मालिकांमध्ये स्वतःला सिद्ध करताहेत ही सरांची कमाई आहे. नाट्य निर्मितीसाठी जागा हवी आणि महिला कलावंतांना जाणे-येणे सोयीचे व्हावे म्हणून त्यांनी स्वखर्चाने राजवाड्याच्या मध्यवर्ती परिसरात राजधानी टॉवर या इमारतीत ऐसपैस हॉल  घेतलाय. तिथे मुलांसाठी अभिनय प्रशिक्षण शिबिरे, नृत्य प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली करतात. शिबिरार्थीना सोबत घेऊन एकांकिका व नाट्यस्पर्धेत सहभागी होतात. 'स्वतःबरोबर इतराचाही विकास करणे' हेच त्यांचे वैशिष्ठय आहे. 


नाट्यकला ही नुसती पुस्तक वाचून येत नाही, तर ती गुरूच्या मार्गदर्शनानुसार आत्मसात करावी लागते. त्यासाठी चांगले गुरू मिळणे हे गरजेचे असते. अभिजित वाईकर हे सातारच्या नवोदितांमधून चांगले रंगकर्मी घडवत आहेत हे आम्हा कलावंतांचे भाग्य आहे. मला तर वाटते की इतरांच्या रक्तात असलेल्या ए, बी, ओ अशा रक्तगटापेक्षा सरांच्या रक्तात " नाटक " हा देखील एक रक्तग्रुप असावा असे वाटते. नाटक हा त्यांचा श्वास आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. आज पुण्यामुंबईची नाटके उर्वरित महाराष्ट्रात लावणे हे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. त्यात नाटकासारख्या जिवंत कलेपुढे आज प्रचंड मोठी-मोठी आव्हाने उभी आहेत. टिव्ही च्या पडद्यावर उपलब्ध असणारे नाना तऱ्हेचे मनोरंजन आणि मोबाईल च्या इंचभर स्क्रिनवर येणाऱ्या ढीगभर वेबसिरीज...! अभिजित सर म्हणतात, 'हातातला रिमोट व मोबाईल बाजूला ठेऊन या मरगळलेल्या प्रेक्षकांना थिएटर वर आणण्यासाठी मला नाटक करायचंय!' स्वस्त आणी सहज उपलब्ध असणाऱ्या मनोरंजनाचे पर्याय रसिकांना सुखावू लागले आहेत. पैसे खर्च करून मनोरंजन करून घेणे, हे लोक विसरू लागलेत. सातारच्या 3 ते 4 चित्रपटगृहांची अवस्था सर्वज्ञात आहे. उत्तम अशी सिनेमा थिएटर्स बंद झाली आहेत. आता नाट्यगृहे हे व्यसनी लोकांचे हक्काचे अड्डे व्हावेत, जुगारी लोकांचे बसण्याचे ठिकाण व्हावे असे वाटत नसेल तर समाजातील विचारी लोकांनी विचार करणे गरजेचे आहे. नाट्य चळवळ वाढवण्यासाठी धडपडणाऱ्या अशा लोकांच्या मागे समर्थपणे उभे राहणे गरजेचे आहे. येऊ घातलेल्या प्रतिकूल परिस्थितीवर एकच उपाय आहे तो म्हणजे स्थानिक कलावंतानी व्यावसायिक पद्धतीने, उत्तम रित्या प्रेक्षकांना खेचून आणणारे सादरीकरण करणे, धनिक- व्यावसायिकांनी नाट्य निर्मितीसाठी आर्थिक हातभार लावणे व रसिकांनी तिकीट काढून नाटकांना व कलाकारांना उत्तेजन देणे ! साताऱ्यात अभिजित वाईकरांनी ती सुरुवात केली आहे, आता इतरही स्थानिक नाट्यसंस्था तसेच प्रयोग करताहेत हे चित्र आशादायक आहे...!


अभय शरद देवरे