‘एफडीए’ची पुण्यात मोठी कारवाई; ४७ लाखांचा खाद्यान्न साठा जप्त

 

स्थैर्य, पिंपरी, दि.२३: दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) खाद्यान्न तपासणी मोहीम सुरू केली आहे. पुणे जिल्ह्यातून खाद्यतेल, तूप, मिठाई, रवा, मैदा अशा विविध पदार्थांचे ९५ नमुने तपासणीसाठी घेतले असून, भेसळीच्या संशयावरून तूप, खाद्यतेल आणि इतर अन्नाचा ४७ लाख ५९ हजार रुपये किमतीचा तेरा टनाहून अधिक माल जप्त केला आहे.

दसरा आणि दिवाळी सणासाठी विविध खाद्य पदार्थांची मोठ्याप्रमाणावर खरेदी केली जाते. मागणी वाढल्याने या काळात कमी दजार्चे अथवा भेसळयुक्त खाद्यान्न येण्याची शक्यता अधिक असते. यापूर्वी एफडीएने परराज्यातून आलेली कमी दर्जाची गुजरात बर्फीचे साठे जप्त केले आहेत. ग्राहकांना सकस आणि भेसळमुक्त खाद्य पदार्थ मिळावेत या साठी एफडीएने जिल्ह्यात खाद्यान्न तपासणी मोहीम हाती घेतली आहे.

खाद्यतेलाचे २१, तूप ५, नमकीन, रवा आणि मैद्याचे प्रत्येकी २, मिठाई १९ आणि इतर खाद्यान्नाचे ४४ नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. भेसळीच्या संशयावरून २९ लाख ४ हजार १५३ रुपयांचे ६८११.४ किलो खाद्यतेल साठा जप्त करण्यात आला आहे. तर पाच प्रकरणात २ लाख ४८ हजार रुपयांचे ४९९ किलो तूप जप्त करण्यात आले आहे. तर, इतर खाद्यपदार्थांचा २ लाख ६५ हजार रुपये किंमतीचा ५ हजार २२७ किलो साठा जप्त करण्यात आला आहे. मार्केटयार्ड येथून भेसळीच्या संशयावरून साडेतेरा लाखांचा साठा जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे भेसळीच्या संशयावरून जप्त केलेला साठा ४२ लाख ५३ हजार रुपयांवर गेला आहे.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya