कोरोनाशी लढा; भारताने दिला अमेरिकेला मदतीचा हात!

 

स्थैर्य, वॉशिंग्टन, दि.१२: कोरोनाविरोधातील लढाईत अमेरिकेला भारताने मदतीचा हात दिला आहे. भारताने १.८ दशलक्ष एन९५ मास्क पेनसिल्व्हेनिया राज्यातील सर्वात मोठे शहर फिलाडेल्फियाला दिले आहे. कोविड १९ विरोधातील लढाई अधिक तीव्र करण्याच्या उद्देशाने हा सहभाग घेतला आहे. त्याचबरोबर आरोग्य क्षेत्रात अशी भरीव मदत करत भारत-अमेरिका मैत्री संबंध अधिक दृढ करण्यास मदत केली आहे.

फिलाडेल्फियाचे महापौर जिम केन्ने यांनी, भारताला मास्क पुरवण्याची विनंती केली होती. हे मास्क कोरोना साथीच्या आजाराचा सामना करणासाठी प्रत्यक्ष काम करणा-या कर्मचा-यांकडून वापरले जाणार आहेत. अमेरिकेतील भारताचे राजदूत तरनजितसिंग संधू यांनी शुक्रवारी ट्विट करून हे मास्क मिळाल्याची माहिती दिली आहे. ‘आरोग्य क्षेत्रातील भारत आणि अमेरिका यांच्यात विश्वासार्ह भागीदारीचे हे आणखी एक उदाहरण असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

या उदाहरणावरून वैयक्तिक संरक्षण उपकरण (पीपीई) तयार करण्यात भारत सक्षम असल्याचे दिसून येते. याशिवाय केवळ देशांतर्गत वापरासाठीच नव्हे तर निर्यातीसाठीही पीपीई करण्याची क्षमता भारताने विकसित केली आहे, असेही मत या निमित्ताने अधिका-यांनी व्यक्त केले.

अमेरिकेत कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग फैलावला आहे. अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या ८० लाखांच्या घरात पोहचली आहे. त्यापैकी दोन लाख १९ हजारजणांचा मृत्यू झाला आहे. तर, ५० लाख ८९ हजारजणांनी कोरोनावर मात केली आहे. तर, दुसरीकडे कोरोनाला अटकाव करणारी लस विकसित करण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. अमेरिकेतील तीन लशींची चाचणी अंतिम टप्प्यात आली आहे. त्यापैकी फायजर ही लस डिसेंबर महिन्यात येणार असल्याची चर्चा आहे.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya