एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी : एसटी कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या पगारासाठी अनिल परबांनी घेतली अर्थमंत्र्यांची भेट, येत्या गुरुवारपर्यंत होणार एक महिन्याचा पगार

 

स्थैर्य, दि.२: गेल्या काही महिन्यांपासून एसटी महामंडळाच्या लाखो कर्मचाऱ्यांचा पगार रखडलेला आहे. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. तसेच यामुळे एसटी कर्मचारी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. आता त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कर्मचाऱ्यांचा एका महिन्याचा पगार येत्या गुरुवारपर्यंत (8 ऑक्टोबर) जमा होईल, अशी घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली आहे.

गेल्या पाच साडेपाच महिन्यांपासून कोरोना काळात एसटी बस सेवा या बंद होत्या. केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू होत्या. या काळात एसटी महामंगळाला प्रचंड आर्थिक तोटा सहन करावा लागला. एसटी सुरूवातीलाच तोट्यात होती. यामध्ये लॉकडाउनमुळे दुष्काळात तेरावा महिना अशी अवस्था महामंडळाची झाली. त्यामुळे एसटी जास्तच तोट्यात गेली. याच कारणाने एसटी कर्मचाऱ्यांचे पगार गेल्या काही महिन्यांपासून रखडले होते. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री अनिल परब यांनी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी पगाराची थकीत रक्कम तात्काळ देण्यात यावी याबाबतची मागणी केली आहे.

या भेटीनंतर अनिल परब यांनी ट्विट करत एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी बातमी दिली. 'एसटी कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या पगाराबाबत अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.या भेटीत कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याचे त्यांनी मान्य केले.कर्मचाऱ्यांचा एका महिन्याचा पगार येत्या गुरुवारपर्यंत त्यांच्या खात्यात जमा होईल. उर्वरित पगाराबाबत लवकरच चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.' असे ट्विट परब यांनी केले आहे.
Previous Post Next Post