हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरण : राहुल गांधींना धक्काबूक्की झालीच नाही, गर्दीमुळे ते तोल जाऊन पडले असावे- रावसाहेब दानवे

 

स्थैर्य, दि.२: उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी जात असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी धक्काबुक्की केल्याची घटना काल(दि.1) घडली होती. या प्रकाराचे राज्यभर पडसाद उमटले, अनेक ठिकाणी काँग्रेसकडून या घटनेविरोधात निदर्शने करण्यात आली. यातच आता भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

माध्यमांशी बातचीतदरम्यान दावन म्हणाले की, 'राहुल गांधींना कोणीही धक्काबूक्की केली नाही. गर्दीतून चालत जात असताना त्यांचा तोल जाऊन ते पडले असावे. एवढ्या मोठ्या नेत्याला धक्काबुक्की कोणीही करू शकत नाही. आम्हीही अनेकदा अशा गर्दीत जातो. लोकांच्या गर्दीमुळे तोल जाऊ शकतो', अशी प्रतिक्रिया रावसाहेब दानवे यांनी दिली आहे.

राहुल, प्रियंकांना धक्काबुक्कीचे राज्यात पडसाद; सुळे, संजय राऊतांकडून निषेध

हाथरस येथील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गेलेले काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवून धक्काबुक्की व अटक केल्याचे पडसाद शुक्रवारी राज्यात उमटले. उत्तर प्रदेश सरकारच्या या दडपशाहीविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने मंत्रालयाशेजारच्या गांधी पुतळ्यासमाेर आंदोलन केले.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली. या वेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, माजी मंत्री नसीम खान, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, आ. झिशान सिद्दिकी, माजी मंत्री अनिस अहमद, बाबा सिद्दिकी, प्रदेश सरचिटणीस मोहन जोशी, सचिन सावंत, प्रदेश सचिव राजाराम देशमुख, झिशान अहमद यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी उत्तर प्रदेशातील भाजप सरकार व योगी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya