फलटण तालुक्यात अतिवृष्टी व नदी, नाले, ओढ्यांना आलेल्या पुरामुळे शेत जमिनी, रस्ते, त्यावरील पूल, उभी पिके, फळबागांचे प्रचंड नुकसान : तातडीने पंचनामे करुन अहवाल देण्याच्या सूचना

 


स्थैर्य, फलटण दि.१९: अतिवृष्टी आणि नदी, नाले, ओढ्यांना आलेल्या पुरामुळे फलटण तालुक्यात शेत जमिनी, रस्ते, नदी, नाले ओढ्यावरील पूल तसेच शेत जमिनीच्या बांध बंदीस्तीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, उभी पिके, फळबागा, राहती घरे, जनावरांचे गोठे वगैरेंचे जवळपास तालुक्यातील प्रत्येक गावात काही ना काही नुकसान झाले आहे, शासनाच्या संबंधीत यंत्रणांनी या सर्व बाबींचे पंचनामे करुन, नुकसान भरपाईसाठी शासनाला त्वरित अहवाल पाठवावा अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. 

आपदग्रस्तांना दिलासा व नुकसानीची पाहणी करण्यासाठी दौरा

महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सर्व संबंधीत यंत्रणांना सुस्पष्ट अहवाल तयार करुन दुरुस्ती व नुकसानीची माहिती देण्याचे निर्देश दिले असून फलटण पंचायत समितीच्या सभागृहात संबंधीत यंत्रणांचे अधिकारी व पदाधिकार्‍यांची बैठक घेवून आ. दीपक चव्हाण, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, पंचायत समिती सभापती श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर यांनी तालुक्यातील आपद्ग्रस्त भागाचा दौरा करण्याचे नियोजन केले व त्याप्रमाणे नुकसानीची पाहणी करुन आपदग्रस्तांना दिलासा दिला आहे.

धरणातील मोठा विसर्ग व प्रचंड पावसाने नदी, नाले, ओढ्यांना मोठे पूर

विशेषतः दि. 13,14 व 15 ऑक्टोबर रोजी एका दिवसात झालेला पाऊस सरासरी 100 मि. मी. पेक्षा अधिक असल्याने तालुक्यातील बाणगंगा नदीसह सर्व ओढ्या नाल्यांना प्रचंड पूर आले, सर्व धरणे अगोदर पूर्ण भरलेली असल्याने या धरणातील पाणी साठा नियंत्रीत करण्यासाठी पाटबंधारे खात्याच्या अधिकार्‍यांनी पूर्व सूचना देऊन नीरा नदी पात्रात वीर धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरु ठेवला, परिणामी नदी काठच्या गावातील लोकवस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने त्या कुटुंबांचे, तसेच शेत जमिनी व त्यामधील पिके, फळबागा यांचे, रस्ते, पूल, पर्यायी मार्ग वगैरेंचे मोठे नुकसान झाले आहे, नीरा नदी प्रमाणेच बाणगंगा नदी व ओढे, नाल्यांच्या पुरामुळेही शेत जमिनी व पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

आ. दीपक चव्हाण व संजीवराजे यांचा संबंधीत अधिकार्‍यांसह दौरा

आ. दीपक चव्हाण, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी महसूल व कृषी खात्याचे अधिकारी व तलाठी, मंडलाधिकारी, ग्रामसेवक, कृषी मंडलाधिकारी, कृषी सहाय्यक यांच्या समवेत तालुक्यातील आपदग्रस्त भागाची पाहणी करुन संबंधीत यंत्रणांना पंचनामे करण्याच्या सूचना देताना आपदग्रस्त शेतकरी, नागरीक, कामगार यांच्या भेटी घेऊन त्यांना दिलासा दिला आहे.
प्राथमिक पाहणीत 1500 हेक्टरवर क्षेत्रातील विविध पिकांचे नुकसान : आकडा वाढणार
कृषी खात्याच्या अधिकार्‍यांनी केलेल्या पाहणीनुसार 3699 शेतकर्‍यांच्या 1513.50 हेक्टर क्षेत्रातील मागास बाजरी, सोयाबीन, कांदा, मका, केळी, कापूस, द्राक्षे, भाजीपाला, ऊस आदी पिकांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक पाहणीत आढळून आले असून त्यापैकी वरील क्षेत्राचे पंचनामे झाले असले तरी बाधीत क्षेत्र आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत असून नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम अद्याप सुरु असल्याचे प्रभारी तालुका कृषी अधिकारी सुहास रणसिंग यांनी सांगितले.

रस्ते, पुलांचे मोठे नुकसान : ग्रामीण दळण वळण ठप्प

नदी, नाले, ओढ्यांना आलेल्या प्रचंड पुरामुळे तालुक्यातील अनेक ओढ्यावरील पाईप व सी. डी. वर्कद्वारे करण्यात आलेले पूल पाईपासह वाहुन गेले आहेत, काही ठिकाणी या पुलांचे भराव वाहुन गेले आहेत, काही ठिकाणी रस्ते वाहुन गेले आहेत, रस्त्याची कामे सुरु असलेल्या ठिकाणी तयार केलेले पर्यायी रस्ते, पूल वाहुन गेल्याने या सर्व ठिकाणाहुन ये जा करणार्‍या ग्रामस्थांची, प्रामुख्याने ग्रामीण भागातून शहराकडे दूध, भाजीपाला, फळे घेऊन जाणारे शेतकरी, शहराकडे रोजगारासाठी जाणारे मजूर, औषधोपचारासाठी शहराकडे जाणारे वृध्द, महिला व अन्य रुग्ण यांची मोठी कुचंबना होत असून सदर सर्व रस्त्यांची दुरुस्ती तातडीने करुन वाहतूक त्वरित सुरळीत करण्याच्या सूचना आ. दीपक चव्हाण व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी संबंधीत शासकीय/निमशासकीय यंत्रणांना दिल्या आहेत.

सातारा-सोलापूर जिल्ह्यांना जोडणारा पूल उभारण्यासाठी मोठी आर्थिक तरतूद

सातारा-सोलापूर जिल्ह्यांना जोडणार्‍या शिंदेवाडी, ता. माळशिरस व शिंदेनगर, ता. फलटण या दोन गावामधील पूल वाहुन गेल्याने सर्व प्रकारची वाहतूक ठप्प झाली आहे, दरम्यान नाबार्ड 25 योजनेतून या ठिकाणी सुमारे 2 कोटी 65 लाख रुपये खर्चाचा पूल श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी मंजूर करुन घेतला आहे. सदर रस्त्याची निविदा प्रक्रिया सुरु असून लवकरच या पुलाचे काम सुरु होणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता महेश नामदे यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

सोमंथळी व बोडकेवाडी पूल वाहुन गेल्याने ग्रामस्थांची कुचंबना

सोमंथळी जुन्या रेल्वे लाईन परिसरातील पिंपळवाडी - सोमंथळी - मांगोबा माळ या रस्त्यावर सोमंथळी ओढ्यावर असलेल्या पुलाचा भराव वाहुन गेल्याने संपूर्ण रस्त्यावरील वाहतुक ठप्प झाली असल्याने सदर भरावाची दुरुस्ती तातडीने करण्याच्या तसेच गिरवी-बोडकेवाडी रस्त्यावरील जानुबाई ओढ्यावरील सिमेंट पाईप व भराव वाहुन गेल्याने बोडकेवाडी ग्रामस्थांचा संपर्क तुटला असल्याने सदर रस्ता त्वरित दुरुस्त करुन वाहतूक सुरळीत करण्याच्या सूचना संबंधीत यंत्रणांना देण्यात आल्या आहेत.

तालुक्यातील खालील 17 रस्त्यांची अतिवृष्टी व पुरामुळे दुरावस्था झाली आहे

तरडगाव-सुळ वस्ती ग्रामा19 कॉजवे, तरडगाव-रावडी गायकवाड वस्ती ग्रामा13 कॉजवे, मुंजवडी-गुरसाळे ग्रामा 147 कॉजवे, पवारवाडी-शिंदेनगर-शिंदेवाडी ग्रामा 132 कॉजवे, प्रमा 15 ते चव्हाणवाडी ग्रामा 294 कॉजवे, फलटण-सातारा रस्ता ते आदर्की खु॥ रस्ता ग्रामा 315 संरक्षक भिंत व कॉजवे, कापशी-नवामळा ग्रामा 277 मोरी दुरुस्ती, मिरगाव-सांजोबा मंदिर रस्ता, कुरवली बु॥ अडागळे वस्ती रस्ता ग्रामा 152 कॉजवे, निंबळक शेरेवस्ती-साठे ग्रामा 101 दुरुस्ती, फलटण गिरवी रस्ता ते सासकल ग्रामा 198 दुरुस्ती, मांडवखडक-निरगुडी ग्रामा 211 कॉजवे, गिरवी-जाधववाडा रस्ता ग्रामा 193 कॉजवे, फलटण-बारामती ते हनुमंतवाडी सोमंथळी रस्ता ग्रामा 68, सावतामाळी नगर ते दुधेबावी ग्रामा 176 दुरुस्ती, निरगुडी ते बेघरवस्ती ग्रामा 197 दुरुस्ती, जिंती-साखरवाडी ते तांबेवस्ती ग्रामा 40 या रस्त्यावरील सदर कामांची दुरुस्ती करण्यासाठी अंदाजे 1 कोटीहून अधिक रक्कमेची आवश्यकता असल्याचे जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग फलटणचे उपअभियंता सुनिल गरुड यांनी निदर्शनास आणून देत त्याबाबत वरिष्ठांमार्फत निधीच्या तरतुदीसाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. 

फलटण-उपळवे मार्गावरील बाह्यवळण मार्ग वाहुन गेल्याने वाहतूक ठप्प

फलटण - कुरवली - उपळवे प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक 67 रस्त्यावरील 3 नवीन पुलांचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत प्रगतीपथावर आहे, सदर ठिकाणचे बाह्यवळण रस्ते अतिवृष्टी व ओढ्याच्या पुरामुळे वाहून गेल्याने या मार्गावरील सर्वच गावातील ग्रामस्थांची कुचंबना होत असल्याने सदर बाह्यवळण रस्त्यांची दुरुस्ती तातडीने करण्याच्या सूचना बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत.

फलटण शहरातही काही कुटुंबांना अतिवृष्टी व पुराचा तडाखा

तालुक्याच्या ग्रामीण भागाप्रमाणेच शहरातील बाणगंगा नदीकाठच्या शनीनगर, पठाणवाडा, मलठण वगैरे भागातील कुटुंबांची नदीच्या प्रचंड पुरामुळे मोठी हानी झाली आहे. काहींच्या घरांची पडझड झाली आहे तर काहींचे घरातील कौटुंबिक साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेले आहे. आ. दिपक चव्हाण व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी या कुटुंबांची भेट घेवून आपद्ग्रस्त भागांची पाहणी केली असून या कुटुंबाना दिलासा दिला आहे. 

स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकार्‍यांसमवेत आपद्ग्रस्त भागाला दिलासा

आ. दीपक चव्हाण, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी तालुक्यातील विविध रस्ते, शेतजमिनी, शेतातील उभी पिके, फळबागा, राहती घरे, जनावरांचे गोठे वगैरेंच्या नुकसानीची पाहणी करुन आपदग्रस्तांशी संपर्क साधून त्यांना दिलासा दिला त्यावेळी महसूल, कृषी, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद बांधकाम वगैरे खात्याचे अधिकारी तसेच संबंधीत गावातील जिल्हा परिषद पंचायत समिती आजी माजी पदाधिकारी, सदस्य, सरपंच, सोसायट्यांचे चेअरमन, सहकारी संस्थांचे पदाधिकारी आणि शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.

तालुका अंतर्गत रस्ते मजबुत, रुंद करुन त्यावर उंच पूल उभारावेत

फलटण तालुक्यातून आगामी काळात 3 राष्ट्रीय महामार्ग जाणार असल्याने मुख्य रस्त्यांची फारशी अडचण राहणार नाही, तथापी तालुका 100 % बागायत होत असताना ग्रामीण भागात वाढणारे कृषी प्रक्रिया उद्योग, शेती उत्पादनांची व शेती औजारे, खते, बी-बियाणे, कीटक नाशके यांची वाहतूक करणार्‍या वाहनांची वाढती संख्या तसेच कृषी सुधारणेतून ग्रामीण भागात येणार्‍या सुबत्तेद्वारे वाढणारी सर्वच प्रकारच्या वाहनांची संख्या लक्षात घेऊन तालुक्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांचे रुंदीकरण, मजबुतीकरण, डांबरीकरण प्राधान्याने करताना आता पाईप किंवा सी. डी. वर्क बंद करुन सर्व ठिकाणी उंच बॉक्स पुलांची उभारणी करण्याची आवश्यकता असल्याने रस्ते करताना या बाबी विचारात घेतल्या गेल्या पाहिजेत, किंबहुना ती काळाची गरज आहे.