कंगना रनोटने पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर साधला निशाणा, म्हणाली - 'कहाँ राजा भोज कहाँ गंगू तेली, सत्तेसाठी वडिलांची तत्त्वे विकली'

 


स्थैर्य, मुंबई, दि.२४: अभिनेत्री कंगना रनोट हिने पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. शनिवारी सकाळी एका ट्विटमध्ये कंगना म्हणाली की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या वडिलांची तत्त्वे विसरले आहेत. रिपब्लिक टीव्हीविरोधात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरच्या मुद्यावरुन पत्रकारांवर अत्याचार करणा-या अशा सरकारचा धिक्कार असो, असे कंगना म्हणाली आहे.

कंगनाविरोधात दाखल झाली आणखी एक तक्रार

बीएमसीने कंगनाच्या कार्यालयाची तोडफोड केल्यापासून ती गेल्या काही दिवसांपासून सतत महाराष्ट सरकार, बीएमसी, मुंबई पोलिस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेताना दिसत आहे.अभिनेत्री कंगना रनोट हिच्याविरोधात मुंबईत आणखी एक एफआयआर दाखल झाला आहे.

याकाळात तिने मुंबई पोलिस आणि धर्मावरुन आक्षेपार्ह ट्विट केल्याबद्दल मुंबईतील वकील अली काशिफ खान यांनी अंधेरी काेर्टात तिच्याविरोधात गुन्हेगारी तक्रार दाखल केली आहे. कंगनाने वांद्रे मॅजिस्ट्रेट काेर्टाकडून तिच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्याच्या आदेशानंतर साेशल मीडियावर न्यायपालिकेविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचे खान यांनी मुंबईच्या अंधेरी काेर्टात दाखल केलेल्या अर्जात म्हटले आहे. कंगनावर देशद्राेह आणि समाजात द्वेष पसरवण्याचाही आरोप करत त्यांनी ती सोशल मीडियाचा गैरवापर करत असल्याचे सांगितले. कंगना समाज, कायदा, तपास यंत्रणा व न्यायपालिकेची थट्टा करत आहे, असे खान म्हणाले आहेत.

काेर्ट या प्रकरणात 10 नोव्हेंबरला सुनावणी करणार आहे. वांद्रे कोर्टाच्या आदेशावरून मुंबई पोलिसांनी कंगनावर गुन्हा दाखल केला. तिला 26-27 ऑक्टोबरला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले आहे.

10 दिवसांत कंगनाविरोधात ही तिसरी तक्रार

मागील 10 दिवसांत कंगनाविरोधात दाखल झालेली ही तिसरी तक्रार आहे. 10 दिवसांपूर्वी शेतक-यांचा अपमान केल्याप्रकरणी तुमकुर (कर्नाटक) येथील क्याथासांद्रा पोलिस ठाण्यात तिच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. कंगनाने सीएए विरुद्ध झालेल्या आंदोलनाचा संदर्भ देत कृषी विषयक विधेयकांविरुद्ध आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर निशाणा साधला त्यांना दहशतवादी म्हटले होते. तिच्या या वक्तव्यावरुन तिच्याविरोधात वकील एल. रमेश नाइक यांनी तक्रार दाखल केली होती.

पाच दिवसांपूर्वी कास्टिंग डायरेक्टर आणि फिटनेस ट्रेनर साहिल अशरफ अली सय्यद यांच्या याचिकेवर सुनावणी देताना वांद्रे कोर्टाने कंगनाविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले होते. हिंदू आणि मुस्लीम या दोन समुदायांमध्ये परस्परांविषयी द्वेष निर्माण होईल आणि जातीय सलोखा बिघडेल, अशा हेतुने वारंवार ट्विट करत असल्याच्या आरोप कंगना आणि तिची बहीण रंगोली चंडेल यांच्यावर आहे. वांद्रे न्यायदंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशानुसार कंगना व तिच्या बहिणीविरोधात वांद्रे पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. 124 अ (राजद्रोह) यासह विविध कलमांखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya