सन्मानाने जगण्यासाठी सूर लावू दे - बँड वादकांची महापालिका आयुक्तांकडे मागणी; व्यायामशाळे बरोबर बँड विषयीही निर्णय करु - विक्रम कुमार यांचे आश्वासन

 

स्थैर्य, पुणे दि.२२: ऐन लग्न सराईच्या तोंडावर मार्च अखेरी पासून कोरोना व टाळेबंदी सुरू झाली. हातातोंडाशी आलेला घास परिस्थितीने हिरावून नेला. तेव्हा पासून कसेबसे दिवस काढत जगलो.दरम्यान गणपती उत्सवासारख्या मुख्य मोसमानेही टाळेबंदी सुरुच असल्याने हात रिकामेच ठेवले. आता परिस्थिती हातघाईवर आली आहे.त्यात तुळशीच्या लग्नानन्तर लग्नसराई सुरू होईल. आता जर आमची वाद्ये वाजवण्याची परवानगी मिळाली नाही तर मरण्याचीच पाळी आमच्यावर येईल. म्हणून सन्मानाने जगण्यासाठी ब्रास बँड मधिल आमच्या वाद्यांना सुर लावण्याची परवानगी द्या. अशी आर्त मागणी शहरातील बँड वादक, चालक यांनी पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे आज केली.

आज दि 22/10/2020 रोजी पुण्याचे आयुक्त विक्रम कुमार यांना बँड वादक-चालक संघटना, पुणे बॅन्ड कला विकास प्रतिष्ठानचे शिष्टमंडळ भेटले. संघटनेचे मार्गदर्शक नितीन पवार , संघटनेचे अध्यक्ष चेतन ववले, उपाध्यक्ष ओंकार आढाव, सचिव अमोद सोलापूरकर , सल्लागार बाळासाहेब आढाव , खजिनदार हेमंत माने यांचा शिष्टमंडळात समावेश होता. नगरसेविका अश्विनी कदम यांच्या पुढाकाराने झालेल्या या भेटीत महापालिका आयुक्तांना पारंपरिक बँड चालक-वादकांचे प्रश्न मांडणारे निवेदन देण्यात आले. 

क्लरोनेट, ट्रम्पेट,सनई, थाप ढोल, ड्रम इ.पारंपरिक वाद्याच्या बँडची 500वर पथके जिल्ह्यात असून त्यात 10 हजार वादक आहेत. त्यांच्या 50 हजारावर कुटुंबियांची वादन काम बंद असल्याने उपासमार होत आहे. 

सध्या लग्नात एकूण 50 माणसांनाच उपस्थितीची परवानगी असल्याने बँड पथकाला वेगळी परवानगी नाही. संख्या वाढू नये म्हणून बँडला फाटा दिला जातो.म्हणून केटरिंग व्यावसायिकांच्या धर्तीवर बँड वादकांच्या वेगळ्या संख्येला लग्न समारंभात परवानगी द्या,अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्यावर या मागणी विषयी आयुक्तांनी सहानभूती व्यक्त केली. तसेच टाळेबंदी शिथिलीकरणाच्या आगामी टप्प्यात व्यायामशाळे सोबत बँड विषयीही निर्णय घेऊ,असे ते म्हणाले.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya