लायन्स क्लब फलटण गोल्डनचे सेवाकार्य प्रेरणादायी : लायन प्रशांत साळुंखे

 

झोन चेअरमन ला.प्रशांत साळुंखे यांचे हस्ते ऑक्सि मीटर व ऑक्सि किट देताना. डावीकडून ला.मंगल घाडगे, ला.नीलम पाटील, ला.उज्वला निंबाळकर, ला.प्रशांत साळुंखे, ला.बापू जगताप व ला.अर्जुन घाडगे

स्थैर्य, फलटण, दि.२२: छत्रपती शिवाजी महाराजांचे काळातील हिरोजी इंदुलकर यांनी अनेक किल्ले बांधण्याची सेवा केली. हे काम त्यांनी कोणत्याही मोबदल्यासाठी न करता मोठ्या निष्ठेने सेवाकार्य म्हणून केले. त्याच पद्धतीने लायन्स क्लब फलटण गोल्डन निस्वार्थीपणे सेवाकार्य करत आहेत. त्यांचे हे सेवाकार्य इतरांना प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार, लायन्स क्लब झोन चेअरमन लायन प्रशांत साळुंखे यांनी काढले. 

‘लायन्स क्लब फलटण गोल्डन’ च्या अध्यक्षपदी लायन्स सौ.उज्वला निंबाळकर यांची एक वर्षासाठी एकमताने फेर निवड करण्यात आली. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी लायन साळुंखे बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी लायन्स सौ.उज्वला निंबाळकर उपस्थित होत्या. कार्यक्रमास लायन्स क्लबचे अध्यक्ष लायन बापू जगताप, सचिव लायन महेश साळुंखे, खजिनदार लायन विवेक गायकवाड यांची उपस्थिती होती. यावेळी झोन चेअरमन लायन प्रशांत साळुंखे यांचे हस्ते लायन्स मुधोजी आय हॉस्पिटलचे पेशंटसचे बेड्साठी बेडशीट्स व पल्स ऑक्सीमीटर अध्यक्ष लायन्स उज्वला निंबाळकर यांचे सौजन्याने हॉस्पिटलचे अध्यक्ष लायन अर्जुन घाडगे यांचेकडे सुपुर्द करण्यात आले. तसेच गोल्डन क्लबमार्फत कोरोना रुग्णांसाठी गरजेनुसार आवश्यक असणारे ऑक्सीजन कीट सुरज रणजित निंबाळकर यांचे सौजन्याने मोफत उपलब्ध केले आहे व झोन चेअरमन लायन प्रशांत साळुंखे यांचे हस्ते लायन अर्जुन घाडगे यांचेकडे सुपुर्द केले आहे. 

अध्यक्षीय भाषणात लायन्स उज्वला निंबाळकर यांनी सेवाकार्य करत असताना ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांचेबद्दल ऋण व्यक्त करुन सर्व सदस्यांचे सहकार्याबद्दल आभार मानले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक लायन्स सुनीता कदम यांनी केले. सचिव अहवाल लायन्स निलम पाटील, खजिनदार अहवाल लायन्स मंगल घाडगे यांनी सादर केला. प्रमुख पाहुण्यांचा परिचय लायन नेहा व्होरा यांनी करुन दिला. 
लायन प्रशांत साळुंखे यांचे हस्ते गोल्डन क्लबमध्ये लायन्स प्रा.निलम देशमुख, लायन्स मयुरी करवा, लायन्स डॉ.सीता जगताप व लायन्स प्रा.धनश्री भोईटे या चार नूतन सदस्यांचे स्वागत करण्यात आले. 

आंतरराष्ट्रीय लायन संघटनेला 103 वर्षे पूर्ण होत असून 215 हून अधिक देशांमध्ये 47 हजारहून अधिक क्लब्स्च्या सहाय्याने व 14 लाखाहून अधिक सदस्य अनेक क्षेत्रामध्ये समाजोपयोगी व मानव उन्नतीसाठी विविध क्षेत्रात सेवा कार्य करत आहेत. लायन्स क्लब फलटणनने मार्च 2020 मध्ये प्रायोजक केलेला फक्त महिला सदस्यांचा लायन्स क्लब फलटण - गोल्डन ज्याचे संस्थापक सदस्य 20 असून त्याची लायन सौ.उज्वला रणजित निंबाळकर यांनी सक्षमपणे अध्यक्षपदाची धुरा सांभाळत असताना मार्च 2020 पासून संपूर्ण जगात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसमुळे सामाजिक कार्य करणेस अनेक अडचणी आल्याने पुढील लायनेक वर्षे जुलै 2020 ते जून 2021 साठीसुद्धा एकमताने लायन्स सौ.उज्वला निंबाळकर यांचीच अध्यक्षपदी फेरनिवड एकमताने करण्यात आली त्यांनी विंचुर्णी गावात लॉकडाऊनचे काळात कमिन्स इंडिया लि; बहुराष्ट्रीय कंपनीचे सहाय्याने संपूर्ण गावात व वाड्यावस्तीवर निर्जंतूक - रेन्साची फवारणी टॅ्रक्टरद्वारे केली. गरजू ग्रामस्थांना धान्य उपलब्ध करुन दिले. तसेच कोवीड योद्धा आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका यांना सॅनिटायझर व मास्क पुरविण्यात आले. तसेच विंचुर्णी गावातील 13 रुग्ण पॉझीटीव्ह जे विलगीकरण क्षेत्रातील गावी निगेटिव्ह होऊन परत आलेवर त्यांचे पुष्प, मास्क व सॅनीटायझर देऊन स्वागत केले. सदरचे सेवाकार्यामुळे विंचुर्णी गावात परत एकसुद्धा कोरोना रुग्ण आढळून आला नाही. तसेच क्लबचे वतीने कोरोना योद्धा ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, आशावर्कर, अंगणवाडी सेविका व शिपाई यांचा यथोचीत सत्कार व ग्रामपंचायतीमार्फत उत्तम कार्य केलेबद्दल त्यांना मानधनसुद्धा प्रोत्साहनपोटी देण्यात आले. फलटण शहरातील शासनाचे सर्व कोवीड सेंटरला रुग्णांना आवश्यक असणारे वाफेचे मशिन्स - 100 नग मोफत पुरवण्यात आले. फलटण नगरपरिषदेचे महिला सफाई कामगार यांना मल्टीविटामीन व फॉलीक अ‍ॅसिडच्या गोळ्या मोफत देऊन त्यांची रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त असे मार्गदर्शन केले. चौधरवाडी गावात लायन्स मयुरी कर्वा यांनी 100 किलो साखर व लायन्स सवीत दोशी यांची चहा पावडर व बिस्कीट यांचे सौजन्याने क्लबमार्फत मोफत गरजू ग्रामस्थांना वाटप करण्यात आले. लायन विजय लोंढे पाटील यांचे सहकार्यान श्रीमंत सगुणामाता प्राथमिक विद्यालय, सस्तेवाडी येथे डिजीटल क्लासरुमला आवश्यक असणारे सर्व उपकरणे देऊन एक कायम स्वरुपी प्रकल्प उभारण्यात आला. 

दरमन, रविवार, दि.18 ऑक्टोबर रोजी गॅट व एल.सी.आय.एफ.कॉनक्लेव या 7 जिल्ह्यातील सेमीनारमध्ये माजी प्रांतपाल लायन अशोक मेहता यांनी 7 जिल्ह्यातील 63 क्लब्सनी जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर 2020 या तीन महिन्यात केलेल्या सेवाकार्याचा व मिळालेल्या गुणांचा अहवाल सादर केला. त्या निकालात लायन्स क्लब, फलटण गोल्डनचा प्रांतात तिसरा क्रमांक व 30 हून कमी सदस्यत्व असताना क्लब्समध्ये प्रांतात प्रथम क्रमांक आला असून अध्यक्ष लायन्स उज्वला निंबाळकर व त्यांचे पूर्ण टीमचे संपूर्ण प्रांतातून कौतुक केले आहे. गोल्डन क्लब सुरु करुन एक वर्षसुद्धा पूर्ण झाले नसताना अल्पावधीत मिळवलेल्या या यशामुळे फलटणचे नाव प्रांतात मानाने उंचावले आहे.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya