मनसे-शिवसेना नेत्यांची मध्यरात्री गुप्त बैठक, राजकीय चर्चांना उधाण

 

स्थैर्य, मुंबई, दि.११: मनसेचे नेते बाळा नांदगावकर आणि शिवसेना स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यात गुप्त बैठक झाली असल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकीनंतर मनसे आणि शिवसेनेत काय गुफ्तगू झाली असावी अशा चर्चांना उधाण आलं आहे. खरंतर, राज्यात एकीकडे कोरोनाचा कहर वाढताना दिसतोय तर दुसरीकडे राजकीय पक्षांमध्ये खडाजंगी सुरू आहे. कोरोना काळात अनेक मागण्यांसाठी मनसेनं आक्रमक पवित्रा घेतल्याचं आपण सगळ्यांनीच पाहिलं आहे. यावेळी वारंवार शिवसेनेवर आणि ठाकरे सरकारवर मनसेकडून निशाणा साधण्यात आला. पण आता रात्री झालेल्या या बैठकीमुळे राजकीय चर्चा रंगल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बाळा नांदगावकर आणि शिवसेना स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यात रब्बरवाला हाऊस इथं ही बैठक पार पडली असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर या बैठकीत नेमकं काय झालं याचे आता तर्क वितर्क लावण्यात येत आहेत.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मनसे अनेक मुद्द्यांवर रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. मग तो लोकल सुरू करण्याचा मुद्दा असो, वाढीव वीजबिलावरोधात असो किंवा भूमीपुत्रांची भरती असो. या सगळ्यावर मनसेनं तीव्र भूमिका घेत तत्काळ बदल करण्याची मागणी सरकारकडे केली.

खरंतर, शनिवारीच मनसेच्या महिला सेनेच्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकारला वाढीव वीजबिलावरोधात निवेदन दिलं होतं. मनसेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री सचिवालय, नवी मुंबईतील कोकण भवन यांना निवेदन देण्यात आलं होतं. या निवेदनात मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी राज्य सरकारला 15 दिवसांचा अवधी दिला आहे. जर येत्या 15 दिवसात लाईट बिल कमी केलं नाही, तर नवी मुंबई मनसे महिला शहर अध्यक्षा डॉ. आरती धुमाळ यांनी आम्ही आमरण करू असा इशारा दिला आहे.

लोकल सुरू करण्याच्या मागणीसाठीही सत्ताधारी शिवसेना आणि मनसेत जुंपली होती. यामध्ये भूमीपुत्रांच्या हक्काचा मुद्दाही मागे नव्हता. टपाल वाहन सेवेत होत असणा-या रिक्त जागांच्या भरतीत स्थानिक मराठी भूमीपुत्रांना प्रथम प्राधान्य मिळावे, यासाठी मनसेकडून सर्व प्रथम हात जोडून विनंती अर्ज करण्यात आला. त्यामुळे या सगळ्या मागण्यांविषयी चर्चा करण्यासाठी ही गुप्त बैठक झाली असल्याचंही बोललं जात आहे.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya