मराठा समाजाच्या तीव्र विरोधानंतर अखेर एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली, नवीन तारीख लवकरच जाहीर होणार

 

स्थैर्य, दि.१०: सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी राज्यात जोर धरू लागली होती. यानंतर आज अखेर ठाकरे सरकारने एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली आहे. या निर्णयानंतर मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, रविवारी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून, कोणताही विद्यार्थी अपात्र ठरणार नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, '11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात एमपीएसची परीक्षा होती. पण, कोरोनाचे संकट अजूनही काही प्रमाणात आहे. त्यामुळे आम्ही एक सारासार विचार केला. विद्यार्थ्यांना अभ्यासाला वेळ मिळाला पाहिजे हा विचार आम्ही केला त्यामुळे आम्ही ही परीक्षा पुढे ढकलत आहोत. परीक्षा कधी होणार याचा निर्णयही लवकरच घेतला जाईल,' असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले.

'एमपीएसच्या परीक्षेची तारीख सध्या आम्ही पुढे ढकलली आहे. पण, यापुढे जी तारीख ठरेल त्या तारखेत बदल केला जाणार नाही. मराठा समाजाकडूनही आम्हाला परीक्षा पुढे ढकला अशी विनंती केली होती. आता जे विद्यार्थी परीक्षेला पात्र आहेत तेच विद्यार्थी जेव्हा परीक्षा जाहीर होईल तेव्हा त्या परीक्षेसाठी अपात्र ठरणार नाही,' असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya