मेट्रोचे नियंत्रण आरे कॉलनीतूनच!

 

स्थैर्य, मुंबई, दि.१६: पर्यावरण रक्षणाच्या मुद्यावर मेट्रो तीनची कारशेड आरे कॉलनीतून सरकारने हद्दपार केली असली तरी मुंबई महानगरांतील मेट्रो मार्गिकांचे परिचलन आरे कॉलनीतूनच होणार आहे. त्यासाठी प्रस्तावित असलेली मेट्रो भवनाची जागा राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या राखीव वन क्षेत्रातून वगळलेली आहे. या जागेच्या वापर बदलासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच नगरविकास विभागाकडून त्याबाबतची अधिसूचना अपेक्षित असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून हाती आली आहे.

मुंबई महानगरांमध्ये १४ मेट्रो मार्गिकांची कामे प्रगतीपथावर असून त्यांचे जाळे सुमारे ३३७ किमीचे आहे. त्यांच्या परिचलनासाठी २७ मजली मध्यवर्ती नियंत्रण केंद्र (मेट्रो भवन) आरे काँलनी येथे प्रस्तावित आहे. मात्र, मेट्रो तीन मार्गिकेच्या कारशेडच्या विरोधात पर्यावरणवाद्यांसह राजकीय पक्षांनी दंड थोपटल्यानंतर केवळ कारशेडच नाही तर मेट्रो भवनाचे कामही अनिश्चिततेच्या भोव-यात सापडले होते. या ठिकाणाहून कारशेड हद्दपार करण्याचा निर्णय विद्यमान सरकारने घेतला असला तरी मेट्रो भवन आरे काँलनीत उभारण्यासाठी सरकार अनुकूल असल्याचे वृत्त आहे. या कॉलनीतील राखीव वन क्षेत्रात मेट्रो भवनच्या जागेचा समावेश केलेला नसल्याच्या वृत्ताला वन विभागातील वरिष्ठ अधिका-यांनी दुजोरा दिला आहे. मेट्रो भवनच्या कामालाही पर्यावरण प्रेमींचा विरोध आहे. त्यामुळे जागेचा वापर बदलाची अधिसूचना निघाल्यानंतर त्यांच्याकडून आक्रमक प्रतिक्रिया येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मेट्रो भवन उभारणीसाठी मंजूर झालेली २.३० हेक्टर जागा ग्रीन झोनमध्ये आहे. तिथल्या वापर बदलासाठी आवश्यक असलेली हरकती सूचनांची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून त्याबाबतचा अहवाल राज्य सरकारला पाठविण्यात आला आहे. या ठिकाणी मोजकी झाडे बाधित होत असल्याने पर्यावरणाचा -हास होत असल्याच्या आरोपांमध्ये तथ्य नाही. तसेच, मेट्रो भवनच्या इमारत ग्रीन बिल्डिंगच्या धर्तीवर उभारली जाणार आहे. या केंद्रासाठी १,०७६ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून त्यासाठीची निविदा प्रक्रिया एमएमआरडीएने यापूर्वीच सुरू केलेली आहे. वापर बदलाबाबतची अधिसूचनेच्या प्रतीक्षेत आम्ही आहोत. ती निघाल्यानंतर पुढील काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा होईल अशी माहिती एमएमआरडीएतल्या वरिष्ठ अधिका-यांनी दिली.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya