मिसेस फडणवीसांची सरकारवर पुन्हा टीका

 


स्थैर्य, मुंबई, दि.१५: राज्यातील मंदिरे सुरू करण्याच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण तापलेले आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगदसिंह कोश्यारी यांच्या याविषयावरुन चांगलाच 'सामना' रंगला. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य करत त्यांच्यावर टीका केली होती. या टीकेला शिवसेनेने उत्तर दिले होते. आता यावर अमृता फडणवीसांनी शिवसेनेवर पुन्हा निशाणा साधला आहे. फिर क्या उखाडेगी बुलडोजर सरकार? असा खोचक सवाल अमृता फडणवीसांनी केला.

अमृता फडणविसांनी ट्विट करत शिवसेनेला डिवचल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांनी म्हटले की, 'माझ्याकडे ना घर, ना दार; मग काय उखडणार बुल्डोजर सरकार' असा प्रश्न अमृता फडणवीसांनी उपस्थित केला आहे. त्यांच्या अधिकृत ट्विटरवर ट्वीट करत त्यांनी हा सवाल उपस्थित केला.

अमृता यांनी बुधवारी ट्विट केले होते की, 'महाराष्ट्रात बार आणि दारुची दुकाने उघडण्याची सूट आहे, मात्र मंदिर हे धोक्याच्या झोनमध्ये आहेत. विश्वास न ठेवणाऱ्या लोकांना सर्टिफिकेट देऊन स्वतःला सिद्ध करावे लागते, असे लोक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर (एसओपी) लागू करण्यात अपयशी ठरतात.'

या ट्विटवरुन शिवसेनेच्या सभागृह नेत्या विशाखा राऊत प्रसारमाध्यमांवर प्रतिक्रिया देत असताना अमृता फडणवीसांना जोरदार उत्तर दिले होते 'अमृता फडणवीस कोण आहेत? आमदार, खासदार, नगरसेविका की प्रवक्त्या..त्या माजी मुख्यमंत्र्याच्या पत्नी आहेत. त्यांनी त्याच भूमिकेमध्ये राहावे. खासदार, आमदार, नगरसेवक, प्रवक्ता असेल तर ऐकून घेऊ. पती मुख्यमंत्री झाल्यावर राजकारणात आलेल्यांनी आम्हाला शिकवू नये. जर आम्ही तोंड उघडले तर अमृता फडणवीसांना तोंड लपवायला जागा राहणार नाही' असा आक्रमक पवित्रा शिवसेनेने घेतला होता.

यासोबतच अमृता फडणवीसांवर निशाणा साधत त्या म्हणाल्या होत्या की, 'राघोबादादा पेशवेच्या गादीला आणि समस्त पेशवाईसाठी अपशकून ठरलेल्या आंनदीबाईसारख्या 'Dicey Creature' ला भविष्यात कुणी किंमत दिली नाही.त्यामुळे आजच्या आनंदीबाईनी त्यांच्या राघोबादादाच्या भविष्याचा विचार करून वेळीच आपल्या बेताल बोलण्याला लगाम घालावा.'

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya