मुंबई : आमदारांच्या पत्रांना मंत्री उत्तरे देईनात, मराठवाड्यातील 11 पैकी 10 आमदारांशी मुख्यमंत्र्यांची चर्चा

 

स्थैर्य, मुंबई, दि.२: आपल्या मतदारसंघातील विविध कामांसंदर्भात मंत्र्यांना पत्र लिहिले असता त्याची उत्तरेच मिळत नाहीत अशी तक्रार मराठवाड्यातील आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

गुरुवारी सांयकाळी वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी मराठवाड्यतील शिवसेना आमदार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात मराठवाड्याच्या प्रश्नासंदर्भात बैठक झाली. बैठक दीड तास चालली. ११ पैकी १० आमदार बैठकीला हजर हाेते. या वेळी मंत्र्यांना लिहिलेल्या पत्रांना उत्तर दिले जात नसल्याची बाब औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. आमदार मतदारसंघातील कामांसंदर्भात कायम पाठपुरावा करत असतात. त्यासाठी अनेकदा आम्ही मंत्री कार्यालयास पत्रे पाठवतो. आमच्या पत्रांना मंत्री कार्यालयांकडून उत्तर येणे अपेक्षित आहे. आजपर्यंत हा रिवाज राज्यात सर्व सरकारांकडून पाळण्यात आलेला आहे. मात्र सध्या मंत्री कार्यालयांकडून आमच्या पत्रांना उत्तरेच दिली जात नाहीत, असे शिरसाट बैठकीत म्हणाले. सर्व आमदार प्रत्येक वेळी मुंबईला येऊ शकत नाहीत.फोनद्वारे मंत्रिमहोदयांना कामांची प्रत्येक बाब विचारू शकत नाहीत. त्यामुळे मंत्री कार्यालयांकडून उत्तरे आल्यास मतदारसंघातील कामांची स्थिती आमदारांना कळण्यास मदतच होईल, असे शिरसाट यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली. तसेच आमदारांच्या पत्रांना उत्तरे मिळालीच पाहिजेत, अशी ताकीद मुख्यमंत्र्यांनी लगेच प्रशासनाला दिली.

मराठवाड्याच्या हक्काचे २३ टीएमसी पाणी द्या
मराठवाड्याच्या वाट्यास आलेले २३ टीएमसी पाणी आघाडी सरकारच्या काळात मिळावे, त्यासाठी आपण लक्ष घालून स्थिरीकरणांच्या योजनांना निधी व गती द्यावी, त्याशिवाय दुष्काळी मराठवाड्याचे प्रश्न सुटणार नाहीत, अशी मागणी मराठवाड्यातील शिवसेना आमदारांनी केली.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya