पुण्यात हत्या : युवासेनेच्या पदाधिकाऱ्याची मध्यरात्री निर्घृण हत्या, राजकीय वैमनस्यातून सुपारी देऊन हत्या केल्याचे निष्पन्न, दोन जण ताब्यात

 

स्थैर्य, पुणे, दि.२: पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवसेना युवा सेनेचे कसबा विभाग प्रमुख दीपक विजय मारटकर यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. 5 ते 6 जणांनी तीक्ष्ण हत्याराने वार करुन त्यांची हत्या केली आहे. राजकीय वैमनस्यातून सुपारी देऊन हत्या केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे.

दीपक विजय मारटकर हे मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास जेवण केल्यानंतर घराबाहेर बसले. यावेळी मोटारसायकलवरुन आलेल्या पाच ते सहा जणांनी तीक्ष्ण हत्याराने दीपक यांच्यावर वार केले आणि पळ काढला. यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दीपक यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर उपचारादरम्यान त्यांचा पहाटे साडेचारच्या दरम्यान मृत्यू झाला आहे.

दीपक हे शिवसेनेचे माजी नगरसेवक विजय मारटकर यांचे पुत्र होते. विजय मारटकर यांचे महिनाभरापूर्वीच कोरोनामुळे निधन झाले होते. रात्री घराबाहेर फिरण्यास आलेल्या दीपकवर दबा धरुन बसलेल्या हल्लेखोरांनी हल्ला केला. या निर्घृण हत्येनंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे. फरासखाना पोलिस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya