नवरात्रौत्सव साजरा करण्याबाबतच्या नियमावलीसंदर्भात जिल्हा दंडाधिकारी यांचे आदेश जारी

 

स्थैर्य, सातारा दि.१६: जिल्हा दंडाधिकारी सातारा यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मधील तरतुदीनुसार प्राप्त झालेल्या अधिकारान्वये जिल्ह्यातील सार्वजनिक नवरात्रौत्सव 2020करिता खालीलप्रमाणे आदेश जारी केले आहेत.

सार्वजनिक नवरात्रौत्सवासाठी मंडळांनी महापालिका, स्थानिक प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार यथोचित पुर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता न्यायालयाने निर्गमित केलेले आदेशआणि महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाने मंडपाबाबतचे धोरण यांच्याशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत. या वर्षीचा नवरात्रौत्सव साध्या पद्धतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच यार्वजनिक देवीच्या मुर्तीची सजावट त्या अनुषंगाने करण्यात यावी. 

देवीच्या मुर्तींची उंची सार्वजनिक मंडळाकरिता 4 फुट व घरगुती देवीच्या मुर्तींची उंची 2 फुटांच्या मर्यादित असावी. यावर्षी शक्यतो पारंपारिक देवीच्या मुर्तीऐवजी घरातील धातू, संगमरवर आदी मुर्तीचे पुजन करावे. मुर्ती शाडुची, पर्यावरण पुरक असल्यास तिचे विसर्जन शक्यतो घराच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास कृत्रिम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाशी समन्वय ठेवावा. नवरात्रौत्सवाकरिता वर्गणी, देणगी स्वेच्छेने दिल्यास त्याचा स्वीकार करावा. जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे. तसेच आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी. तसेच माझे कुटुं‍ब माझी जबाबदारी या मोहिमेबाबत देखील जनजागृती करण्यात यावी.

गरबा, दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करु नयेत. त्याऐवजी आरोग्य विषयक उपक्रम, शिबीर (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी. आरती, भजन, किर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतुदींचे पालन करण्यात यावे. देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी.

देवीच्या मंडपामध्ये निर्जतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येवून दर्शन घेवू इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शरिरीक अंतर (फिजिकल डिस्टन्सींग) तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनीटायझर, इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. देवीच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येवू नयेत. विसर्जनाच्या पारंपारिक पद्धतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जनस्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे, संपूर्ण चाळीतील, इमारतीतील सर्व घरगुती देवीच्या मुर्तींच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येवू नये.

महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोक प्रतिनधी, स्वयंसेवक संस्था इत्यादींच्या मदतीने कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी. तसेच नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी स्थानिक प्रशासनाने प्रभाग समिती निहाय मुर्ती स्वीकृती केंद्राची व्यवस्था करावी. याबाबत जास्तीत जास्त प्रसिद्धी देण्यात यावी. मंडपात एकावेळी 5 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांची उपस्थिती नसावी. तसेच मंडपामध्ये खाद्यपदार्थ अथवा पेय पाण्याची व्यवस्था करण्यास मनाई असेल. विसर्जनाच्या तारखेस जर घरगुती तसेच सार्वजनिक नवरौत्सव मंडळाचा परिसर प्रतिबंधीत क्षेत्रात असेल तर, मुर्ती विसर्जन सार्वजनिक ठिकाणी करण्यास मनाई असेल.

दसऱ्याच्या दिवशी करण्यात येणारा रावण दहनाचा कार्यक्रम हा सर्व नियम पाळून प्रतिकात्मक स्वरुपाचा असावा. रावण दहनाकरिता आवश्यक तेवढ्या किमान व्यक्तीच कार्यक्रमस्थळी हजर राहतील. प्रेक्षक बोलवू नयेत. त्यांना फेसबुक इत्यादी समाज माध्यमातून थेट प्रक्षेपणाद्वारे बघण्याची व्यवस्था करावी. कोविड-19 विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परित्रकानंतर व प्रत्यक्ष उत्सव सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे लागेल, असेही आदेशात जिल्हा दंडाधिकारी शेखर सिंह यांनी नमुद केले आहे.
Previous Post Next Post