अभिनेता विवेक ओबेरॉयच्या घरी पोलिसांची छापेमारी, ड्रग्ज प्रकरणात झाडाझडती

 

स्थैर्य, मुंबई, दि.१६: बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयच्या मुंबई येथील घरी बंगळूरु पोलिसांनी छापा टाकला आहे. दुपारी एक वाजता बंगळूरु पोलीस विवेकच्या घरी पोहोचले आणि त्यांनी झाडाझडती घेण्यास सुरुवात केली. पोलीस विवेकचा मेहुणा आदित्य अल्वा याचा तपास करत आहेत. तो बंगळूरुतील ड्रग्ज कनेक्शनमध्ये आरोपी आहे.

कर्नाटकचे माजी मंत्री जीवाराज अल्वा यांचा मुलगा आदित्य अल्वा याचा अमलीपदार्थ प्रकरणात बंगळुरू पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणात कन्नड सिनेसृष्टीतील गायक, कलाकार यांचे कनेक्शन समोर आले आहे.

विवेक ओबेरॉय हा आदित्य अल्वाचा नातेवाईक आहे. ‘आदित्य हा विवेक ओबेरॉयच्या घरी लपला असावा अशी माहिती आम्हाला मिळाली होती. त्यानुसार आम्ही न्यायालयातून वॉरंट मिळवले आणि केंद्रीय गुन्हे शाखेच्या पथकाने विवेकच्या घरात धडक दिली’, अशी माहिती एका पोलीस अधिका-याने दिली.

कन्नड फिल्म इंडस्ट्रीत होणारे अमली पदार्थांचे सेवन आणि देवाण-घेवाण याविषयीच्या प्रकरणाची चौकशी करणा-या सेंट्रल क्राइम ब्रांचने (सीसीबी) एका व्यक्तीला चित्रपट सृष्टीतील व्यक्तींना ड्रग्ज पुरवल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. या प्रकरणात कन्नड चित्रपटसृष्टीतील काही नावं समोर आली. सुरुवातीला अभिनेत्री रागिनी द्विवेदीचा मित्र रवीशंकरला अटक करण्यात आली. रवीशंकरने चौकशीदरम्यान रागिनीचं नाव घेतलं. त्यानंतर रागिनीच्याही घरी छापे टाकत तिला अटक करण्यात आली. आता या प्रकरणात आणखी नावं समोर आली आहेत.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya