निमसोड गटातील नुकसानीचे तातडीने पंचनामे करा : धनंजय चव्हाण

 

नुकसानीची पाहणी करताना धनंजय चव्हाण व ग्रामस्थ. (छाया : समीर तांबोळी)

स्थैर्य, कातरखटाव, दि. ३० : खटाव तालुक्यात सलग चार दिवस पडत असलेल्या मोठ्या पावसामुळे निमसोड जिल्हा परिषद गटात अनेक शेतकरी तसेच सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणाव नुकसान झाले आहे. प्रशासनाने या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन बाधितांना ताबडतोब भरपाई देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी कातरखटाव गणाचे पंचायत समिती सदस्य व भाजपाचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष धनंजय चव्हाण यांनी केली आहे.


चव्हाण यांनी नुकतीच नुकसान झालेल्या डांभेवाडी, एनकुळ, येलमरवाडी, येरळवाडी, बोंबाळे, कातरखटाव शिवार, कणसेवाडी आदी ठिकाणी समक्ष जावून पाहणी केली. यावेळी विक्रम बागल, दादासाहेब नलवडे, रामचंद्र तुपे, लक्ष्मण बनसोडे, कोंडीबा नलवडेे, मनोज तुपे, बबन गायकवाड, राजेंद्र तुपे, अधिक तुपे, नवनाथ बनसोडे, सतिश बनसोडे, शंकर अडसुळ, कोंडीबा बनसोडे आदी उपस्थित होते.


चव्हाण म्हणाले, सततच्या पावसामुळे या भागातील अनेक गावात कांदा, घेवडा, मुग, बटाटा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेताच्या ताली, माती बंधारे, ओढ्याकाठची शेती वाहून गेली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तर गावा-गावांना जोडणारे लहान मोठ्या रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. महसूल विभाग, कृषी विभाग, बांधकाम विभाग, लघुपाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत. तसेच बाधित शेतकर्‍यांना भरपाई देण्यासंदर्भात तातडीने व्यवस्था करावी. अन्यथा पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही चव्हाण यांनी दिला आहे.


 

वाहून गेलेली महिला व म्हैस वाचविण्यात यश

डांभेवाडी येथे ओढ्याच्या पुरात  उमा विजय नलवडे व त्यांची पाळीव म्हैस सुमारे १५० फुट वाहून गेली होती. म्हैस व  नलवडे यांना गावातील युवकांनी दोर टाकून पुरातून बाहेर काढले.  चव्हाण यांनी या कुटुंबाचीही भेट घेवून त्यांच्या धाडसाचे कौतुक केले.Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya