सणासुदीला डाळींच्या किमती कमी होण्याची शक्यता

 

स्थैर्य, नवी दिल्ली, दि.१४: देश सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. याच दरम्यान अनेक गोष्टी महाग झाल्याने त्याचा फटका हा लोकांना बसत आहे. मात्र आता सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. डाळींच्या किमती कमी होण्याची शक्यता असून मोदी सरकारने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. अनेकदा सणांच्या कालावधीत डाळी महाग होतात. पण आता सरकारने या गोष्टीची गांभीर्याने दखल घेतली असून डाळींची आयात करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकार जवळपास पाच लाख टन डाळींची आयात करणार आहे. डायरेक्टरेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेड म्हणजेच डीजीएफटीने 2020-21 साठी उडीद आणि तूर डाळीची आयात कोटा यादी जारी केली आहे. सरकारने चार लाख टन तूर डाळीची आयात करण्यास मान्यता दिली आहे. याशिवाय सुमारे दीड लाख टन उडीद डाळ आयात करण्याचीही परवानगी देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, व्यापा-यांना 15 नोव्हेंबरपर्यंत 4 लाख टन तूर डाळ आयात करावी लागणार आहे. यासाठी आवश्यक ती पावलं उचलण्यास सांगण्यात आली आहेत.

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वाधिक झालेल्या पावसाचा परिणाम हा तूर पिकावर होणार आहे. यामुळे उत्पन्न दहा टक्क्यांनी कमी होऊ शकतं. तर तूर आणि उडीद डाळ यांच्या किमती अलिकडच्या काळात सर्वाधिक वाढल्या आहेत. एक महिन्यापूर्वी 80 ते 90 रुपये किलो मिळणारी तूर डाळ आता 20 ते 25 रुपयांनी महाग झाली आहे. रिपोर्टनुसार, सरकारने गेल्या वर्षी ऑक्टोबर 2019 पर्यंत 18.7 लाख टन डाळीची बाहेरून खरेदी केली होती. तर 2018-2019 मध्ये 25.3 लाख टन डाळ आयात केली होती.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya