‘स्पुटनिक-व्ही’ नंतर आता रशियाच्या दुस-या कोरोना लसीलाही मंजुरी

 

स्थैर्य, मास्को, दि.१६: जगभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. कोरोनापुढे प्रगत देशही हतबल झाले आहेत. जगभरात लाखो लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. अशा परिस्थितीत जगभरातील देशांमध्ये कोरोनावरील लस तयार करण्याचे प्रयत्न सुरु आहे.

जगातील देशांना पुन्हा आश्चर्यचकित करत रशियाने आणखी एक कोरोनावरील लस तयार केली आहे. सुरुवातीच्या टप्प्यातील चाचण्यांमध्ये चांगले परिणाम दिसून आल्यानंतर रशियाने ही लस मंजूर केल्याचा दावा केला आहे.

रशियाने १२ ऑगस्टला जगातील पहिली लस स्पुतनिक-व्ही ला तिस-या टप्प्यातील चाचणी पूर्ण होण्याआधीच मंजुरी दिली होती. आता दुसरी कोरोनावरील लस एपिवॅककोरोनाला मंजुरी देण्यात आली आहे.

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी बुधवारी देशातील दुसरी कोरोना लस तयार होण्याची घोषणा केली. रिपोर्टनुसार, सरकारी अधिका-यांसमवेत झालेल्या बैठकीदरम्यान रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी बुधवारी जाहीर केले की, देशात दुस-या कोरोनावरील लस ‘एपिवॅककोरोना’ मंजूर झाली आहे.

सुरुवातीच्या चाचणीमध्ये चांगले परिणाम दिल्यानंतर लस मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला. पेप्टाइड-आधारित एपिवॅककोरोना लस सायबेरियातील वेक्टर इन्स्टिट्यूटने विकसित केली आहे.

दुस-या लसीची घोषणा करताना रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन म्हणाले की, ‘आता आम्हाला पहिल्या आणि दुस-या लसीचे उत्पादन वाढविणे आवश्यक आहे. पेप्टाइड आधारित एपिवॅककोरोना लस सायबेरियातील वेक्टर इन्स्टिट्यूटने तयार केली आहे आणि कोरोना रोखण्यासाठी या लसीचे दोन डोस दिले पाहिजेत.’

जवळपास 100 स्वयंसेवकांवर ही लसीची चाचणी करण्यात आली. या चाचणीत भाग घेतलेले स्वयंसेवक 18 ते 60 या वयोगटातील होते. ही लस दोन महिन्यांपासून सुरू आहे आणि दोन आठवड्यांपूर्वी प्राथमिक स्टडी पूर्ण झाली आहे. लसीच्या सुरुवातीच्या चाचण्या यशस्वी झाल्या आहेत आणि स्टडी पूर्ण झाल्यानंतर त्यास मान्यता देण्यात आली आहे.

एपिवॅककोरोना लसीशी संबंधित स्टडीचे परिणाम अद्याप प्रसिद्ध केले नाहीत. ही लस विकसित करणा-या शास्त्रज्ञांनी सांगितले की, कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी पर्याप्त अँटीबॉडी तयार करतात आणि यामुळे तयार केलेली प्रतिकारशक्ती सहा महिन्यांपर्यंत टिकू शकते. मात्र, चाचण्या सुरू असतानाही ही लस लोकांना दिली जाणार की नाही हे अद्याप अस्पष्ट आहे.

रशियाच्या उपपंतप्रधान ततयाना गोलिकोवा यांना ही लस दिली गेली आहे. यापूर्वीही त्यांनी स्वयंसेवक म्हणून सुरुवातीच्या चाचणीत भाग घेतला होता. गोलिकोवा म्हणाले की, कोरोनावरील ‘एपिवॅककोरोना’ लसीच्या पुढील टप्प्यातील चाचणीसाठी देशभरातील 40,000 लोकांना निवडले जाणार आहे.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya