सातारा पालिकेचे कर्मचारी, प्राथमिक शिक्षकांना सानुग्रह अनुदान द्यावे; अन्यथा 22  ऑक्टोबर पासून काम बंद आंदोलन : रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचा इशारा

 

स्थैर्य, सातारा दि. १६: सातारा नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी व नगरपरिषद प्राथमिक शिक्षक यांना वीस हजार व ठेकेदारी पध्दतीने काम करणार्‍या कर्मचार्‍यांना प्रत्येकी दहा हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची मागणी रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनने केली आहे. या मागणीचे निवेदन फेडरेशन अध्यक्ष गणेश दुबळे यांनी नगराध्यक्ष माधवी कदम यांना सादर केले.

फेडरेशनच्या वतीने सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे की कोविडच्या पार्श्‍वभूमीवर नगरपालिका कर्मचार्‍यांनी अथक मेहनत केली. या कामात पालिका कर्मचारी प्रसंगी कोविड बाधितही झाले. मात्र, शहराच्या कामकाजाचा गाडा मात्र थांबला नाही. येत्या नोव्हेंबर महिन्याच्या दुसर्‍या आठवडयात दिवाळी घेत असून पालिका अधिकारी व कर्मचारी यांना सानुग्रह अनुदान देण्याची परंपरा सुरू आहे. करवसुली आरोग्य विद्युत पाणीपुरवठा जन्म मृत्यू या सर्वच भागात पालिका कर्मचार्‍यांचे काम अत्यंत प्रामाणिकपणे सुरू आहे. कोरोनाच्या संवेदनशील काळातही सातारा पालिका शिक्षण मंडळाच्या शिक्षकांनी सर्व प्रकारची सर्वेक्षण व माझे कुटूंब व माझी जवाबदारी या मोहिमांमध्ये सक्रीय सहभाग घेतला. त्यामुळे आर्थिक बाबी अडचणीच्या असतानाही अधिकारी व शिक्षक यांना वीस व कंत्राटी कामगारांना दहा हजार रूपये सानुग्रह अनुदान दिवाळीपूर्वी देण्यात यावे, अशी मुख्य मागणी फेडरेशनच्या वतीने करण्यात आली आहे.

याशिवाय महिला कर्मचार्‍यांना पाच हजार रुपये भाऊबीज भेट व घंटागाडी चालक व स्वच्छता कर्मचारी यांना प्रत्येकी तीन हजार रूपये भेट म्हणून देण्याचा आग्रह गणेश दुबळे यांनी सातारा नगर परिषदेकडे धरला आहे. अंगणवाडी सेविका, मदतनीस आशा कर्मचारी व शिक्षक यांना वेतन मानधनासह चौदाव्या वित्त आयोगाच्या व्याजातून एक हजार रुपये प्रोत्साहन भत्ता द्यावा. अन्यथा 22 ऑक्टोबर पासून कर्मचारी बेमुदत काम बंद ठेवतील, असा इशारा पालिका प्रशासनाला देण्यात आला आहे.
Previous Post Next Post