शाळा बंद असल्याने भारताला ४०० अब्ज डॉलर्सचा फटका

 

स्थैर्य, नवी दिल्ली, दि.१३ : कोरोना साथीमुळे शाळा अनेक दिवस बंद राहिल्याने भारताला ४०० अब्ज डॉलर्सचा शैक्षणिक फटका बसण्याची शक्यता जागतिक बँकेच्या एका अहवालात वर्तवण्यात आली आहे. दक्षिण आशिया भागात शाळा बंदमुळे ६२२ अब्ज डॉलर्सचा फटका बसण्याची शक्यता आहे. यापेक्षा वाईट परिस्थितीचा विचार करता ८८० अब्ज डॉलर्सचा फटका बसू शकतो.सर्वाधिक फटका भारताला बसणार असून बहुतांश देशांना सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा बराच वाटा यात गमवावा लागणार आहे.

‘बिटन ऑर ब्रोकन- इनफॉर्मलिटी अँड कोविड १९ इन साउथ एशिया’ या अहवालात म्हटले आहे,की दक्षिण आशिया २०२० मध्ये मोठ्या मंदीच्या खाईत सापडणार आहे. याचे कारण कोरोनाने अर्थव्यवस्थेला मोठा फटका दिला आहे. शाळा बराच काळ बंद असल्याने ३.९१ कोटी मुले प्राथमिक व माध्यमिक शिक्षणापासून वंचित राहिली. त्यामुळे शैक्षणिक पेच वाढतच गेला. अनेक देशांनी शाळा बंद असल्याचे परिणाम कमी करण्याचा प्रयत्न केला पण तरी दूरशिक्षणाच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना सहभागी करणे जड गेले आहे. कोरोना साथीमुळे ५५ लाख विद्यार्थी शिक्षणातून गळाले असून त्याचा फटका बसणार आहे. अनेक शाळा मार्चपासून बंद आहेत. काही देशात शाळा सुरू करण्यात आल्या तरी पाच महिने विद्यार्थी शाळेबाहेर होते. त्यामुळे ०.५ विनियोजित वर्ष इतके शैक्षणिक नुकसान झाले आहे. शालेय विनियोजित शैक्षणिक वर्ष अशी नवी संकल्पना जागतिक बँकेने तयार केली असून त्यात विद्यार्थ्यांची शाळेची पूर्ण वर्षे व त्यांचे दर्जात्मक ज्ञान यांची सांगड घालण्यात आली आहे. त्यात मानवी भांडवलाचे मापन करण्याचा प्रयत्न केला आहे. दक्षिण आशियातील मुले जेव्हा कामगार बाजारपेठेते प्रवेश करतील तेव्हा त्यांचे आजीवन नुकसान हे ४४०० डॉलर्सचे असणार आहे. ते एकूण उत्पन्नाच्या ५ टक्के राहील.

भारताचे सर्वाधिक नुकसान
शाळा बंद असल्याने दक्षिण आशियात एकूण ६२२ अब्ज डॉलर्सचे नुकसान होणार असून आणखी वाईट परिस्थितीचा अंदाज गृहीत धरला तर ८८० अब्ज डॉलर्सचे नुकसान होईल. दक्षिण आशियातील देश शिक्षणावर दरवर्षी ४०० अब्ज डॉलर्स खर्च करतात. त्याचा विचार करता शाळा बंद असल्याने मोठे नुकसान होणार आहे. त्यातही भारतात हे नुकसान अधिक असणार आहे.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya