बसेस पूर्ण सॅनिटायझेशन करूनच पुन्हा फेरीला पाठवा; पंचायत समितीच्या मासिक सभेत एसटी महामंडळाला सूचना

 

स्थैर्य, फलटण, दि.११ : सध्या एसटी महामंडळाच्या फलटण आगारामार्फत फलटणच्या ग्रामीण भागांमध्ये एसटी प्रवासासाठी प्रतिसाद नसल्याने एसटी फेऱ्या सुरू केलेल्या नाहीत. परंतु फलटण मधून लांब पल्ल्याच्या गाड्या जात आहेत व एसटी महामंडळाच्या फलटण आगारामार्फत जात असणाऱ्या सर्व बसेसची फेरी पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण बस सॅनिटायझेशन करून इतर आरोग्यविषयक सुविधांची पूर्तता झाल्यानंतरच पुन्हा फेरीला पाठविण्यात याव्यात अशी सूचना पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे यांनी पंचायत समितीच्या मासिक सभेमध्ये मांडल्यानंतर पंचायत समितीचे सभापती श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर-निंबाळकर यांनी एसटी महामंडळाच्या फलटण आगाराला याबाबत योग्य ती कार्यवाही करावी व नागरिकांचे आरोग्यची सर्वतोपरी काळजी घ्यावी असे आदेश दिले.

फलटण पंचायत समितीची मासिक सर्वसाधारण सभा नुकतीच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलावण्यात आलेली होती. यावेळी पंचायत समिती सभापती श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर-निंबाळकर, उपसभापती सौ. रेखाताई खरात यांच्यासह पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.

नुकताच फलटण तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने अनेक ठिकाणी अनेकांचे नुकसान झालेले आहे. पाडेगाव ता. फलटण येथे शॉर्टसर्किट झाल्याने उसाचे नुकसान झालेले आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने योग्य ती कार्यवाही करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना त्याबाबतचे नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी पंचायत समितीच्या उपसभापती सौ. रेखा खरात यांनी पंचायत समितीच्या मासिक सभे दरम्यान केली.

सध्या फलटण तालुक्यामध्ये कोरोना या आजाराचा फैलाव मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. तरी शासकीय अधिकाऱ्यांमध्ये कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण वाढत चाललेली आहे. त्यामुळे फलटण तालुक्यामध्ये असणाऱ्या कोव्हीड केअर सेंटरमध्ये शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी पाच टक्के राखीव बेड ठेवण्याबाबत शासनाने आदेश निर्गमित केलेले होते. त्या आदेशांची अंमलबजावणी फलटण तालुक्यामध्ये काटेकोरपणे करण्यात यावी. या बाबतच्या सूचना सर्व कोव्हीड केअर सेंटरला देण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती डॉ. जगदाळे यांनी पंचायत समितीच्या मासिक सभेमध्ये दिली.
Previous Post Next Post